Ratnagiri News: देवूड येथे विवाहितेची आत्महत्या; रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

Ratnagiri News: देवूड येथे विवाहितेची आत्महत्या; रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

कोल्हापूर येथे उपचार घेऊन घरी परतल्यानंतर राहत्या घरी उचलले टोकाचे पाऊल

रत्नागिरी : Ratnagiri News (रत्नागिरी बातम्या) अंतर्गत रत्नागिरी तालुक्यातील देवूड येथील लावगण देसाईवाडी परिसरात आजारपणाला कंटाळून एका ३६ वर्षीय विवाहित महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मानसी महेश देसाई (वय ३६, रा. लावगण देसाईवाडी, देवूड, ता. जि. रत्नागिरी) असे मृत महिलेचे नाव असून, ही घटना मंगळवार, २४ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली आहे. याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मानसी देसाई या शरीरातील प्रथिनांची कमतरता आणि त्यामुळे अंगावर आलेल्या सूज या आजाराने त्रस्त होत्या. त्यांच्यावर सुरुवातीला रत्नागिरीतील दोन खासगी रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात आले होते. त्यानंतर प्रकृतीच्या पुढील उपचारासाठी त्यांना कोल्हापूर येथील सूर्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. औषधोपचार पूर्ण झाल्यानंतर त्यांचे पती महेश देसाई त्यांना ७ नोव्हेंबर रोजी कोल्हापूर येथून पुन्हा गावी घरी घेऊन आले होते.

Ratnagiri News: मंदिरातील उत्सवावरून पती घरी परतल्यानंतर प्रकार उघड
मंगळवार, २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मानसी यांचे पती गावातील मंदिरातील उत्सव संपवून राहत्या घरी परतले. घराच्या मुख्य दरवाजाला आतून कडी लावलेली असल्याने त्यांनी कडी उघडून घरात प्रवेश केला आणि पत्नीला आवाज दिला; मात्र घरातून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

Shoping fiesta

त्यानंतर त्यांनी घराच्या मागील बाजूस असलेल्या पडवीत जाऊन पाहिले असता, मानसी यांनी ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांना तात्काळ उपचारासाठी रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रात्री पावणेबाराच्या सुमारास तपासून त्यांना मृत घोषित केले. या घटनेची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली असून, पुढील कार्यवाही सुरू आहे.