Supriya Sule यांच्याकडून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित; हल्ल्यानंतर काही तासांतच पुणे पोलिसांनी पाच आरोपींना घेतले ताब्यात
पुणे : Supriya Sule (सुप्रिया सुळे) यांनी पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाच्या गेट नंबर ४ बाहेर भरदुपारी झालेल्या गोळीबार आणि कोयता हल्ल्याच्या घटनेनंतर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याचे पालकत्व घ्यावे, अशी विनंती केली आहे. कात्रज भागातील रहिवासी असलेले मंदार किवळे यांच्यावर बुधवारी दुपारी सव्वाच्या सुमारास हा जीवघेणा हल्ला झाला असून, त्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. भर गर्दीत घडलेल्या या घटनेनंतर न्यायालय परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र पुणे पोलिसांनी वेगाने सूत्रे हलवत अवघ्या काही तासांतच पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे.
या घटनेबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, पुणे हे शिक्षणाचे माहेरघर आणि सुरक्षित शहर मानले जाते, मात्र आज घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. आपल्याला होम कमिटीमध्ये काम करण्याची संधी मिळाली तेव्हापासून गुन्हेगारीमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आणि देशामध्ये पुणे चौथ्या क्रमांकावर येत असल्याचे आपण मुख्यमंत्र्यांना वारंवार सांगत आल्याचे त्यांनी नमूद केले. हा विषय राज्य आणि देशाच्या हिताचा नसून अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगत, लोकप्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याचे पालकत्व घेऊन हे प्रकार थांबवावेत, अशी विनंती त्यांनी केली. पोलिसांचा सार्थ अभिमान असला तरी पुण्यात आल्यानंतर त्यांना काय होते हे कळत नसल्याचेही त्या म्हणाल्या.
Supriya Sule यांच्या विधानापूर्वी कोर्टाबाहेर नेमका काय थरार घडला?
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंदार किवळे हे शिवाजीनगर न्यायालयातील सुनावणी आटोपून गेट नंबर ४ बाहेर आले असता, दोन दुचाकींवरून आलेल्या सहा हल्लेखोरांनी त्यांना घेरले. हल्लेखोरांनी सुरुवातीला त्यांच्यावर पिस्तुलातून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर हातातील कोयत्यांनी त्यांच्यावर जीवघेणे वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मंदार किवळे यांना तातडीने उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले.

काही तासांतच पाच आरोपींना बेड्या; दौंड व पुण्यातून कारवाई
घटनेनंतर पुणे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून काही तासांतच पाच आरोपींना ताब्यात घेतले. या हल्ल्याचा कट रचणाऱ्या अक्षय चव्हाण आणि अमोल चव्हाण या दोघांना पुणे गुन्हे शाखेने पुण्यातून अटक केली, तर थेट हल्ल्यात सहभागी असलेल्या आणि पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या आणखी तीन आरोपींना दौंड परिसरात सापळा रचून ताब्यात घेण्यात आले.













