Deepotsav Sawarde उपक्रमाचे यंदा १८ वे वर्ष; त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त सह्याद्री परिवार आणि रत्नागिरी जिल्ह्यातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती
*चिपळूण *: Deepotsav Sawarde (दीपोत्सव सावर्डे) अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील ‘स्मृतिगंध’ स्मारकस्थळी मंगळवार, २४ नोव्हेंबर रोजी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त तब्बल ५,००० दिवे प्रज्वलित करून दीपोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. सह्याद्री शिक्षण संस्थेचे संस्थापक, माजी खासदार स्व. गोविंदराव निकम आणि स्व. अनुराधा निकम यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी सह्याद्री परिवाराच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यंदा या दीपोत्सवाचे १८ वे वर्ष असून, भक्तिमय आणि उत्साही वातावरणात हा कार्यक्रम पार पडला.
सायंकाळी ७ वाजता सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अनिरुद्ध निकम यांच्या हस्ते स्व. गोविंदराव निकम यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, तर प्रकाश राजेशिर्के यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी संस्थेचे पदाधिकारी, सर्व प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि सह्याद्री परिवारातील सर्व सदस्यांनी एकत्र येत संपूर्ण स्मारक परिसर, म्युझियम, गार्डन आणि मंदिर परिसरात दिवे प्रज्वलित केले. दिव्यांच्या प्रकाशामुळे संपूर्ण ‘स्मृतिगंध’ परिसर उजळून निघाला होता आणि उपस्थितांनी स्व. गोविंदराव निकम व स्व. अनुराधा निकम यांना आदरांजली वाहिली.
Deepotsav Sawarde सोहळ्याला जिल्ह्यातील मान्यवरांची उपस्थिती
गेल्या १८ वर्षांपासून सुरू असलेल्या या दीपोत्सवाला रत्नागिरी जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवर आवर्जून उपस्थित राहतात. यंदाच्या सोहळ्याला संस्थेचे कार्याध्यक्ष अनिरुद्ध निकम, उपाध्यक्ष प्रशांत निकम व युगंधरा राजेशिर्के, सचिव महेश महाडीक, संचालक बाबासाहेब सुर्वे (चंद्रकांत), मानसिंग महाडीक, गुलाब सुर्वे, हरिश्चंद्र सुर्वे तसेच सावर्डेचे पोलीस निरीक्षक आबासो पाटील उपस्थित होते.

याशिवाय महिला व बालकल्याण सभापती सौ. मयुरी शिर्के, जिल्हा परिषद सदस्या सौ. पूजा निकम व सौ. नेहा रहाटे, पंचायत समिती सदस्य सौ. उज्वला घाग-साळवी, सौ. मनस्वी बैकर, सौ. स्नेहा साळवी, सौ. मेघा इंगवले व शौकत माखजनकर, आरडीसीसी बँकेच्या संचालिका सौ. दिशा दाभोळकर, सौ. आदिती देशपांडे, सौ. रविना गुजर, माजी सरपंच सुभाष मोहिरे, रावसाहेब सुर्वे, तुकाराम साळवी यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सह्याद्री शिक्षण संस्थेच्या सर्व शाखांचे प्राचार्य, शिक्षकवृंद आणि सह्याद्री परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.













