रत्नागिरी येथे रेल्वे अधिकाऱ्यांसोबत बैठक आणि खासदार नारायण राणे यांच्या भेटीनंतर कोकणभूमी प्रकल्पग्रस्त कृती समितीचा निर्णय
रत्नागिरी : Konkan Railway Protest (कोकण रेल्वे आंदोलन) अंतर्गत कोकण रेल्वेतील प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी कोकणभूमी प्रकल्पग्रस्त कृती समितीच्या वतीने आज, २६ नोव्हेंबर रोजी रत्नागिरी रेल्वे स्थानक येथे प्रस्तावित असलेले ‘रेल्वे रोको’ आंदोलन तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. खासदार नारायण राणे यांच्याशी झालेली भेट आणि त्यांच्यामार्फत कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांसोबत (सीएमडी) बैठक आयोजित होण्याची निर्माण झालेली शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, १९ डिसेंबरपर्यंत सीएमडींसोबत मीटिंग न झाल्यास २० डिसेंबर रोजी पुन्हा रेल रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा समितीने दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २३ नोव्हेंबर रोजी रत्नागिरी येथील प्रादेशिक रेल्वे व्यवस्थापक कार्यालयात कोकणभूमी प्रकल्पग्रस्त कृती समितीचे पदाधिकारी व प्रतिनिधींची रेल्वे अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीला आरआरएम एस. डी. बापट, वरिष्ठ डीपीओ पी. व्ही. साळगावकर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
Konkan Railway Protest मधील प्रकल्पग्रस्तांच्या प्रमुख मागण्या आणि समितीची बैठक
रेल्वे अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत प्रकल्पग्रस्तांच्या भरतीसंदर्भातील खालील प्रमुख मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली:

प्रकल्पग्रस्तांच्या भरतीसंदर्भातील नकारात्मक गुणपद्धती रद्द करणे.
३५ किलो वजन वाहून नेण्याची शारीरिक चाचणी रद्द करणे.
१ किमी धावण्याच्या चाचणीमध्ये वयानुसार वेळेची सवलत देणे.
या सर्व विषयांवर थेट सीएमडी यांच्यासोबत बैठक घेण्याची मागणी समितीने केली होती. त्यानंतर २४ नोव्हेंबर रोजी जिल्हास्तरीय कार्यकारिणीची बैठक घेण्यात आली, ज्यामध्ये जिल्ह्यातील अधिकाधिक प्रकल्पग्रस्तांशी संपर्क साधून त्यांच्या भूमिका जाणून घेण्यात आल्या आणि सर्वानुमते २६ नोव्हेंबरचे आंदोलन १९ डिसेंबरपर्यंत स्थगित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.













