Right to Services: लोकसेवा हक्क कायद्यात महत्त्वाच्या सुधारणांना मंत्रिमंडळाची मंजुरी; दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर २५ हजारांपर्यंत दंडाची तरतूद

Right to Services: लोकसेवा हक्क कायद्यात महत्त्वाच्या सुधारणांना मंत्रिमंडळाची मंजुरी; दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर २५ हजारांपर्यंत दंडाची तरतूद

Right to Services अधिक प्रभावी करण्यासाठी स्वयं-अपील (Auto Appeal) यंत्रणा आणि अपील निकाली काढण्यासाठी कालमर्यादा बंधनकारक

मुंबई : Right to Services (लोकसेवा हक्क कायदा) अंतर्गत नागरिकांना वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने लोकसेवा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी ‘महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५’ अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने महत्त्वपूर्ण सुधारणांना राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. बुधवारी, २५ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या सुधारणांमुळे नागरिकांचे लोकसेवा मिळविण्याचे अधिकार अधिक बळकट होणार असून, प्रशासनात पारदर्शकता, कार्यक्षमता, शिस्त आणि उत्तरदायित्व वाढण्यास मदत होणार आहे.

या सुधारणेनुसार, लोकसेवा देण्यात दिरंगाई झाल्यास संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. नागरिकांना प्रथम, द्वितीय व तृतीय अपील प्रक्रियेची संपूर्ण माहिती सहज उपलब्ध करून देण्यात येणार असून, आतापर्यंत अधिसूचित न झालेल्या सेवांबाबत आयोगामार्फत शासनाला शिफारस करता येणार आहे. तसेच, ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर केलेल्या अर्जदारांच्या संमतीने सेवा वेळेत न मिळाल्यास ‘स्वयं-अपील’ (Auto Appeal) यंत्रणा आपोआप कार्यान्वित होण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

Right to Services सुधारणेतील प्रमुख तरतुदी आणि प्रशासकीय अधिकार
मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या या सुधारणा विधेयकातील प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:

Anant hights

कालमर्यादा व दंडात्मक कारवाई: प्रथम व द्वितीय अपील निकाली काढण्यासाठी कालमर्यादेचे पालन बंधनकारक राहणार असून, विनाकारण दिरंगाई करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी व अपील प्राधिकाऱ्यांवर २५ हजार रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

आयोगाचे अधिकार: मुख्य आयुक्त व आयुक्त यांना स्वाधिकारे चौकशी व दंडात्मक कारवाईचे अधिकार देणे, अभिलेख व माहिती मागविणे तसेच आयोगाच्या आदेशांचे पुनर्विलोकन करण्याची तरतूद समाविष्ट करण्यात आली आहे.

तपासणीचे अधिकार: विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना लोकसेवा पुरविणारी कार्यालये तसेच अपील प्राधिकाऱ्यांच्या कार्यालयांची तपासणी करण्याचे अधिकार देण्यात येणार आहेत.

वयोमर्यादेत वाढ: या सुधारणा विधेयकात मुख्य आयुक्त व आयुक्तांची कमाल वयोमर्यादा ६५ वरून ६७ वर्षे करण्याची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.

नागरिकाभिमुख आणि गतिमान प्रशासनाच्या दिशेने हे पाऊल अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.