*‘मिशन फिनिक्स’ अंतर्गत रत्नागिरी एलसीबीची चिपळूणमध्ये मोठी कारवाई! पटेल सॉ मिल आवारात छापा टाकून १.३८ लाखांची गांजाची झाडे जप्त*

*‘मिशन फिनिक्स’ अंतर्गत रत्नागिरी एलसीबीची चिपळूणमध्ये मोठी कारवाई! पटेल सॉ मिल आवारात छापा टाकून १.३८ लाखांची गांजाची झाडे जप्त*

पिंपळी खुर्द येथे बेकायदेशीरपणे गांजाच्या झाडांची लागवड करणाऱ्या २० वर्षीय तरुणाला ठोकल्या बेड्या; ५.५३२ किलो गांजाची झाडे हस्तगत

चिपळूण (रत्नागिरी) :
रत्नागिरी जिल्ह्यातून अमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने रत्नागिरी पोलीस दलामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘मिशन फिनिक्स’ अंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) चिपळूण येथे धडक कारवाई केली आहे. चिपळूण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळी खुर्द येथील पटेल सॉ मिलच्या आवारात बेकायदेशीरपणे लागवड केलेली तब्बल १ लाख ३८ हजार ३०० रुपये किमतीची आणि ५.५३२ किलोग्रॅम वजनाची गांजाची झाडे जप्त करण्यात आली असून, याप्रकरणी २० वर्षीय परप्रांतीय तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे.

रात्रीच्या सुमारास गोपनीय माहितीवरून पटेल सॉ मिल आवारात छापा :
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवार, दिनांक २५ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ९.०५ वाजण्याच्या सुमारास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला पिंपळी खुर्द (ता. चिपळूण) येथील पटेल सॉ मिलच्या आवारात गांजाची लागवड केल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने एन.डी.पी.एस. (NDPS) कायद्याच्या अनुषंगाने तेथे छापा टाकला. या तपासणीत पटेल सॉ मिल येथील कामगारांच्या निवासासाठी असलेल्या खोलीमध्ये राहणारा आरोपी अभय प्रदीप पांडे (वय २० वर्षे, मूळ रा. मलापांडे, कापुरवा, पो. कुचेरा, तहसील मिल्कीपूर, पोलीस ठाणे इनायतनगर, जिल्हा अयोध्या, उत्तर प्रदेश) याने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी शासनाने प्रतिबंधित केलेल्या गांजा (कॅनॅबिस) या अंमली पदार्थाच्या वनस्पतींची विनापरवाना लागवड करून त्यांची जोपासना केल्याचे उघडकीस आले.

१.३८ लाखांचा मुद्देमाल जप्त; एलसीबी पथकाची यशस्वी कामगिरी :
पथकाने पंचांसमक्ष सदर गांजाची झाडे जप्त केली असून, त्यांचे एकूण वजन ५.५३२ किलोग्रॅम आणि किंमत १,३८,३०० रुपये इतकी आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपी अभय पांडे याला पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी चिपळूण पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले आहे. ही कारवाई रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे यांच्या नेतृत्वाखाली श्रेणी पोलीस उपनिरीक्षक श्री. प्रशांत बोरकर, पोलीस हवालदार विजय आंबेकर, योगेश नार्वेकर, वैभव मोरे आणि चालक पोलीस हवालदार अतुल कांबळे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

Samarth gold