रत्नागिरी : उच्च न्यायालयातर्फे मुंबईत विशेष लोकअदालत

रत्नागिरी : जिल्ह्यातील ज्या पक्षकारांची प्रकरणे उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत, अशी प्रकरणे समन्वयातून तडजोडीने निकाली काढण्याकरिता मुंबई उच्च न्यायालय येथे ३० नोव्हेंबर व १ डिसेंबरला विशेष लोक अदालतीचे आयोजन केले आहे. या विशेष अदालतीत उच्च न्यायालयात प्रलंबित प्रकरणे दाखल करण्याकरिता जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष सुनील गोसावी आणि सचिव माणिकराव सातव यांनी केले आहे.

उच्च न्यायालयात प्रलंबित तडजोडीस पात्र प्रकरणासाठी संपर्क साधण्याचे आवाहन, तसेच विशेष लोकअदालतीचे फायदे जलद तडजोड आणि विवादांचे निराकरण, विवादांचे किफायतशीर निराकरण, अंतिम आणि कार्यान्वित निर्णय, प्रकरणात लागलेल्या कोर्ट फीचा परतावा तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय परिसर येथे किंवा कार्यालय मोबाईलवर संपर्क साधावा, असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे कळवले आहे. न्यायालयातील तडजोडपात्र प्रलंबित प्रकरणे सामंजस्यातून निकाली काढण्यासाठी लोकअदालत हे प्रभावी माध्यम म्हणून समोर आलेले आहे. अनेक पक्षकारांनी आपली प्रकरणे तडजोडीद्वारे निकाली काढलेली आहेत. तडजोडीद्वारे निकाली निघालेल्या प्रकरणांमुळे प्रलंबित प्रकरणातील पक्षकार यांच्यासोबतय शासन आणि समाज या दोन्ही घटकांना मोठा लाभ प्राप्त झाला आहे. लोकअदालतीमुळे न्यायालयातील प्रलंबित खटल्यांची संख्या कमी करण्यामध्ये मोठ्या प्रमाणात यश प्राप्त झाले आहे. हे यश लक्षात घेता आणि लोकअदालतीद्वारे पक्षकारांना जलदगतीने मिळणारा दिलासा लक्षात घेऊन उच्च न्यायालय, मुंबई तसेच खंडपीठ नागपूर व औरंगाबाद यांनी त्यांच्याकडे प्रलंबित असलेली तडजोडपात्र प्रकरणे जलदगतीने निकाली काढण्याकरिता विशेष लोकअदालतीचे आयोजन केले आहे. प्रलंबित प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासंदर्भातील पहिलाच हा असा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे.

पक्षकारांनी संधीचा लाभ घ्यावा
जिल्ह्यातील ज्या पक्षकारांची प्रकरणे उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत त्यांच्याकरिता आपली प्रकरणे समन्वयातून तडजोडीद्वारे निकाली काढण्याची ही एक सुवर्णसंधी उच्च न्यायालयाने उपलब्ध करून दिलेली आहे. पक्षकारांनी या संधीचा लाभ घ्यावा व प्रकरणे सामंजस्याने सोडवावीत, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:46 PM 12/Nov/2024