चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करताना परशुराम घाट अपघातप्रवणक्षेत्र बनला आहे. पावसाळ्यात कोसळणाऱ्या दरडी, खचणारा रस्ता यामुळे हा घाट चर्चेत असतानाच आता दररोज होणाऱ्या अपघातांमुळे या घाटातील वाहतुकीची ‘वाट’सुद्धा ‘बिकट’च असल्याचेच दिसून येत आहे. यामुळे चौपदरीकरणानंतरही वाहनचालकांची सुरक्षितता आता रामभरोसे पाहायला मिळत आहे. मुंबई-गोवा महामागचि चौपदरीकरण ७५ टक्क्यांहून अधिक पूर्ण झाले आहे. रायगड जिल्ह्यातील काही भाग तसेच आरवली ते राजापूर या भागातील चौपदरीकरण अजूनही पूर्ण होणे बाकी आहे. याशिवाय महामार्गावरील बहुतांश उडाणपूल अद्यापही अपूर्णावस्थेतच आहेत. परशुराम पाटात काँक्रिटीकरण करताना पावसाच्या तोंडावर टेकडीवरील माती खणुन दरीच्या बाजूला भराव केला आणि त्या भरावावर त्याचवर्षी काँक्रिटीकरण करण्यात आले. घाटमाथ्यावरून येणारे पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी नियोजन केलेले नाही.
पेढे, परशुराम ग्रामस्थांच्या दबावामुळे काही ठिकाणी मोऱ्या टाकण्यात आल्या; मात्र, पाणी जाण्यासाठी योग्य मार्ग न दिल्याने घाटात अनेक ठिकाणी रस्ता खेचत आहे, दरडी कोसळत आहेत त्यावर तात्पुरता उपाय म्हणून कोसळलेल्या ठिकाणचा मार्ग बंद करून एकाच मार्गिकवर दुतर्फी वाहतूक सुरू आहे. आता राष्ट्रीय महामार्गाकडून कोकण रेल्वेच्या धर्तीवर दरडी कोसळू नयेत म्हणून लोखंडी जाळीच अन्य उपाययोजना करण्यासाठी निविदा काढण्यात येत आहेत. त्यामुळे आगामी काळात हे होणारे उपाय परशुराम घाटाला तारतील काय? हा प्रश्न आहेच. त्यातच हे करत असतानाच पावसाळ्यात कोसळलेली दरडही उचललेली नाही. त्यामुळे घाटातून प्रवास करणे जिकरीचे झाले आहे.
परशुराम घाटाला पर्यायी मार्ग हवा
चिपळूण-खेड मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा परशुराम घाट महत्त्वाचा आहे. घाटाला पर्यायी मार्ग म्हणून आंबडस-चिरणी हा मार्ग सुरू ठेवला होता; मात्र आता परशुराम घाटाला पर्यायी मार्ग निर्माण करणे काळाची गरज आहे. धामणेदवीमार्गे पेढे असा मार्ग अस्तित्वात येणे सहज शक्य आहे. त्यामुळे महामार्गाला पर्यायी मार्गदखील तयार करणे काळाची गरज बनली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:51 PM 14/Nov/2024