खेड : भरणे येथील नव्या जगबुडी पुलाचा भराव खचल्यानंतर केलेल्या आंदोलनादरम्यान घटनास्थळी दाखल झालेल्या राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या दोन अधिकाऱ्यांना पुलाला बांधल्याच्या प्रकरणातून मनसेचे राज्य सरचिटणीस अॅड. वैभव खेडेकर यांच्यासह ११ जणांची सोमवारी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात वैभव खेडेकर यांना तब्बल दीड महिने तुरुंगवास भोगावा लागला होता. त्यांच्या वतीने अॅड. अश्विन भोसले, अॅड. सिद्धी खेडेकर यांनी काम पाहिले.
जुलै २०१९ मध्ये भरणे येथील नव्या जगबुडी पुलाचा भराव खचल्यानंतर पुलाचे काम निष्कृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप करत मनसे व राष्ट्रवादीने १ तास महामार्ग रोखून धरला होता. वैभव खेडेकर यांच्या आक्रमकतेनंतर घटनास्थळी दाखल झालेल्या राष्ट्रीय महामार्ग खात्याचे कार्यकारी अभियंता आर. के. बामणे, उपविभागीय अभियंता प्रकाश गायकवाड यांना धारेवर धरले होते. अॅड. वैभव खेडेकर यांच्यासह मनसेच्या अन्य कार्यकत्यांनी दोन्ही अधिकाऱ्यांना पुलाला दोरीच्या साहाय्याने बांधण्याचा प्रयत्न केला होता.
याबाबत उपविभागीय अभियंता प्रकाश गायकवाड यांनी येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर अॅड. वैभव खेडेकर, रहिम सहीबोले, सागर कवळे, सुनील चिले, राजेश कदम, शाम मोरे, प्रमोद दाभिळकर, राजेंद्र खेडेकर यांच्यासह अन्य तिघांवर अटकेची कारवाई करण्यात आली होती. याप्रकरणी वैभव खेडेकर यांना दोनवेळा पोलिस कोठडी सुनावल्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:53 PM 25/Sep/2024