मोठी कारवाई! जयगड बंदरातील ‘आमीर गॅस’ जहाज जप्त करण्याचे हायकोर्टाचे आदेश

रत्नागिरी: रत्नागिरीतील जयगड बंदरात उभ्या असलेल्या ‘आमीर गॅस’ (Amir Gas) या जहाजाला जप्त करण्याचे खळबळजनक आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. बोगस कागदपत्रांच्या आधारे माल वळवल्याचा गंभीर आरोप या जहाजावर असून, न्यायमूर्ती अभय आहुजा यांच्या खंडपीठाने याप्रकरणी कडक पावले उचलली आहेत.

नेमके प्रकरण काय?

‘झॅग युनियन इंटरनॅशनल’ या कंपनीने या जहाजाविरोधात तक्रार दाखल केली होती. तपासादरम्यान समोर आले की, या जहाजाचे व्यवस्थापन करणाऱ्या कंपनीने दुबईमध्ये चुकीची माहिती दिली होती. धक्कादायक म्हणजे, जयगड बंदरात येण्यासाठी बनावट कागदपत्रांचा (Fake Documents) वापर करण्यात आला होता. तसेच या जहाजाचे दोन वेगवेगळे मालक असून त्यांच्यातील अंतर्गत मतभेदही चव्हाट्यावर आले आहेत.

न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश

मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत खालील आदेश दिले आहेत:

  • जहाज जप्ती: ‘आमीर गॅस’ जहाज तात्काळ जप्त करण्यात यावे.
  • माल उतरवण्यास मनाई: जहाजावरील ‘एलपीजी (मिक्स) इन बल्क’ हा माल पुढील आदेशापर्यंत उतरवण्यास सक्त मनाई केली आहे.
  • पोर्ट क्लिअरन्स रोखले: जेसएडब्ल्यू जयगड पोर्ट लि. (JSW Jaigarh Port) ला या जहाजाला ‘आऊटवर्ड पोर्ट क्लिअरन्स’ न देण्याचे निर्देश दिले आहेत.
  • हद्दीबाहेर जाण्यास बंदी: हे जहाज भारतीय सागरी हद्दीबाहेर जाऊ नये, याची खात्री संबंधित यंत्रणांनी करावी.

इराकचा माल पाकिस्तानला जाणार होता?

तपासात मिळालेल्या माहितीनुसार, हे जहाज भाडेकरारावर घेतले गेले होते. त्यावरील गॅसचा साठा (कार्गो) इराक मध्ये भरला गेला होता आणि तो पाकिस्तानला नेण्याचे नियोजन होते. मात्र, मधल्या काळात मास्टर बदलून आणि कागदपत्रात फेरफार करून हे जहाज भारतात वळवण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे.

स्थानिक स्तरावर अंमलबजावणी

स्थानिक शिपिंग एजंट मिलिंद बनप यांनी न्यायालयाच्या या आदेशाची पुष्टी केली आहे. सध्या हे जहाज जयगड पोर्टच्या देखरेखीखाली असून, कडक पोलीस आणि सागरी सुरक्षा यंत्रणांच्या निगराणीखाली आहे. या प्रकरणातील आंतरराष्ट्रीय धागेदोरे पाहता, आगामी काळात अधिक मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:46 01-05-2026