रत्नागिरी : बंगालच्या उपसागारत तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावाखाली कोकण किनारपट्टी भागात सोमवारी दिवसभर पावसाचे सातत्य होते. हवामान खात्याने दिलेल्या यलो अलर्टनुसार सोमवारी जिल्ह्यात पावसाने काही भागात जोरदार हजेरी लावली. या पावसाने जिल्ह्यातील अनेक भागात शेतीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
अनेक ठिकाणी भातशेती आडवी झाली आहे. काही भागात ऐन कापणीला आलेले भातपीक ही आडवे झाले आहे. त्याचे तातडीने सर्वेक्षण करण्याच्या सूचना कृषी विभागाने केल्या आहेत.
हवामान खात्याने दोन दिवसांपूर्वीच यलो अलर्ट दिला होता. हा इशारा देण्यात आल्यानंतर शनिवार आणि रविवारी रत्नागिरीत दिवसभर मळभी वातावरण होते. मात्र पाऊस गायब होता. सोमवारी मात्र पावसाने रत्नागिरी जिल्ह्यात ठिय्या मांडला. रात्रीही अनेक भगात जोरदार पाऊस झाला. खबरदारी म्हणून महावितरणने ग्रामीण भागात वीज प्रवाह खंडित केला. रत्नागिरी एमआयडीसी परिसरात त्यामुळे संध्याकाळी आठ वाजेपर्यंत अंधारच होता. मंगळवारीही वीज प्रवाह सातत्याने खंडित करण्यात येत होता. त्यामुळे अनेक भागात पाणीपुरवठाही बाधित झाला.
यंदा शेतीसाठी चांगला पाऊस झाला आहे. त्यातच भातशेतीचे क्षेत्रही वाढले आहे. मात्र, परतीचा पाऊस नुकसानदायक ठरत आहे. रत्नागिरीत सोमवारी संध्याकाळी सुरू झालेला पाऊस रात्रीही मुसळधार कोसळत होता. आता भातशेती अंतिम टप्प्यावर आली आहे. मात्र अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने ही भातशेती आडवी झाली आहे.
हलक्या सरींनंतर ‘जोरधार’
अन्य तालुक्यांतही सोमवारी रात्री पावसाने हलके ते मध्यम सरींचे सातत्य ठेवले होते. खेड, चिपळूणसह रत्नागिरी, संगमेश्वर तालुक्यांतही रात्री पावसाने मुक्काम केला होता. प्रारंभी हलक्या सरींनी सुरुवात केलेल्या पावसाने नंतर जोर धरल्याने अनेक भागात पिकांची हानी झाल्याच्या प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:29 PM 25/Sep/2024