सरकारला प्रश्न विचारणाऱ्यांना पाकिस्तानी बोलण्यात येते मग देशात भारतीय राहिलेत कोण? : अभिजित दीपके

पुणे : नीटसह विविध राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांमध्ये झालेल्या कथित गैरव्यवहारांमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असून, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी याची नैतिक जबाबदारी स्वीकारून तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी कॉक्रोज जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित दीपके यांनी केली आहे.

ही मागणी मान्य न झाल्यास देशभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. या आंदोलनाची सुरुवात आज गुरुवारी (दि.११) सायंकाळी चार वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शांततापूर्ण निदर्शने करण्यात येणार आहेत. त्यानंतर लखनऊ, अमृतसर, जयपूर, बंगळुरू यांसह देशातील विविध शहरांमध्ये आंदोलनाचा विस्तार केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत दीपके यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, नीट, सीयूईटी आणि इतर महत्त्वाच्या परीक्षांबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित होत आहेत. परीक्षा प्रक्रियेतील त्रुटी आणि कथित पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आणि नैराश्य निर्माण झाले आहे. या संपूर्ण परिस्थितीची जबाबदारी कोण घेणार? देशातील तरुणाईचे भविष्य पणाला लागले आहे. अनेक वर्षे मेहनत घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अन्याय सहन करावा लागत आहे. अशा वेळी जबाबदार व्यक्तींनी पुढे येऊन उत्तर द्यायला हवे, असे दीपके म्हणाले.

गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलन सुरू असल्याचे सांगत त्यांनी सरकारला तातडीने हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले. धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारपर्यंत राजीनामा दिला नाही, तर आंदोलन अधिक व्यापक स्वरूपात राबवले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

दीपके म्हणाले, ‘सरकारला प्रश्न विचारणाऱ्यांवर देशविरोधी असल्याचा शिक्का मारण्याची प्रवृत्ती वाढत आहे. लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. सरकारला प्रश्न विचारणाऱ्यांना पाकिस्तानी म्हणायचे, तर मग भारतीय कोण?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

२० जून रोजी दिल्ली येथे देशभरातील विद्यार्थी आणि युवकांना एकत्र आणत मोठे आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत आणि जबाबदारांवर कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरू राहील असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

आंदोलनाला विद्यापीठाची अटींसह परवानगी

कॉक्रोज जनता पक्षाने ११ जून रोजी आयोजित केलेल्या आंदोलन व निदर्शनांसाठी विद्यापीठ प्रशासनाकडे परवानगी मागितली होती. आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्था कायम राखली जावी तसेच कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याच्या अटींसह विद्यापीठ प्रशासनाने आंदोलनास परवानगी दिली आहे.

आंदोलनात सोनम वांगचुक सहभागी होणार

कॉक्रोज जनता पक्षाचे अभिजीत दिपके यांनी त्यांच्या एक्स हँडलवरून सामाजिक कार्यकर्ते हे उद्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात होणाऱ्या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती दिली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:38 11-06-2026