अनधिकृत बांधकामामुळे सुपरवायझरचा मृत्यू; जिल्हा परिषद प्रशासनाचे चौकशीचे आदेश
रत्नागिरी: Ratnagiri Kurdhe Bridge Accident | रत्नागिरी तालुक्यातील कुर्धे येथे एक खळबळजनक आणि गंभीर बाब समोर आली आहे. कुर्धे येथील एका नदीवर बांधकाम सुरू असताना पुलाचा एक भाग कोसळून सुपरवायझरचा जागीच मृत्यू झाला होता. मंगळवारी घडलेल्या या दुर्घटनेनंतर, आता या छोट्या पुलाच्या बांधकामाला प्रशासनाची कोणतीही अधिकृत मंजुरीच नव्हती, अशी धक्कादायक माहिती तपासादरम्यान पुढे आली आहे. सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणणाऱ्या या घटनेची प्रशासनामार्फत उच्चस्तरीय चौकशी सुरू करण्यात आली आहे.
साकव विकास कार्यक्रमांतर्गत प्रस्ताव, मात्र निविदा प्रक्रिया प्रलंबित
कुर्धे गावातील लिंगायतवाडी ते खोताचीवाडी दरम्यान असलेल्या छोट्या नदीवरील जुना साकव (छोटा पूल) पूर्णपणे नादुरुस्त झाला होता. या मार्गावरून ग्रामस्थांना सुरक्षितपणे वाहने नेता यावीत, यासाठी स्थानिकांनी लोकप्रतिनिधींकडे एका मजबूत छोट्या पुलाची मागणी केली होती. ग्रामस्थांच्या या मागणीची दखल घेत साकव विकास कार्यक्रमांतर्गत येथे नवीन पुलाचे काम करण्याचे नियोजन करण्यात आले होते. या कामासाठी सुमारे ५५ लाख रुपयांचा सविस्तर प्रस्तावही तयार करण्यात आला होता; मात्र प्रत्यक्षात या कामाची आवश्यक ती निविदा प्रक्रिया पूर्ण झालीच नव्हती, अशी माहिती आता अधिकृत सूत्रांकडून समोर येत आहे. निविदा मंजूर होण्यापूर्वीच हे काम कोणत्या आधारावर सुरू होते, हा आता तपासाचा मुख्य विषय बनला आहे.
काँक्रीटचे काम सुरू असताना कंत्राटी सुपरवायझरचा मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, या छोट्या पुलाच्या मुख्य संरचनेचे काम प्रगतीपथावर होते आणि केवळ वरचे काँक्रीटचे काम शिल्लक राहिले होते. मंगळवारी नेहमीप्रमाणे काम सुरू असताना अचानक पुलाच्या काँक्रीटचा एक मोठा भाग पत्त्यासारखा कोसळला. या ढिगाऱ्याखाली चिरडून बांधकाम पाहत असलेले सुपरवायझर अक्षय काटे यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. तांत्रिक निकष न पाळता आणि विनापरवाना घाईघाईने काम उरकण्याच्या प्रयत्नामुळेच हा अपघात घडल्याचे प्राथमिक दृष्ट्या दिसून येत आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षांकडून घटनास्थळाची पाहणी
या भीषण अपघाताची माहिती मिळताच रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता केंद्रे आणि उपाध्यक्ष विलास चाळके यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींसह तात्काळ कुर्धे येथील घटनास्थळाला भेट दिली. त्यांनी दुर्घटनाग्रस्त पुलाची प्रत्यक्ष पाहणी करून संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला. या दौऱ्यादरम्यान पदाधिकाऱ्यांनी स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
पावसाळ्यात ग्रामस्थांसाठी तात्पुरती पर्यायी व्यवस्था करण्याचे निर्देश
हा पूल आता दुर्घटनाग्रस्त आणि अर्धवट अवस्थेत राहणार असल्याने आगामी पावसाळ्यात कुर्धे गावातील वाहतूक पूर्णपणे ठप्प होण्याची भीती निर्माण झाली आहे. याचा सर्वाधिक फटका शालेय विद्यार्थ्यांना आणि दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना बसणार आहे. हीच निकड लक्षात घेऊन, पावसाळ्यात ग्रामस्थांची कोणतीही अडचण होऊ नये यासाठी येण्या-जाण्यापुरती तात्पुरती आणि सुरक्षित पर्यायी व्यवस्था निर्माण करून देण्याचे आदेश जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाला दिले आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:49 11-06-2026














