रत्नागिरी टेस्ट ट्यूब बेबी सेंटरमुळे घरे आनंदित झाली : डॉ. अनिरुद्ध आठल्ये

दहावा वर्धापन दिन उत्साहात साजरा

रत्नागिरी : रत्नागिरी सारख्या भागामध्ये टेस्ट ट्यूब बेबी सारखी उपचार पद्धती आणून डॉ. तोरल शिंदे आणि डॉ. निलेश शिंदे यांनी इथली अनेक घरे आनंदी, हसती खेळती केली आहेत, त्याशिवाय आत आपुलकीचे बंध जोडून आजही रुग्णाशी तितकेच सलोख्याचे संबंध ठेवले हे दुर्मिळ असल्याचे गौरवोद्गार रत्नागिरीचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी काढले.

त्यांच्या प्रमुख उपस्थितीत धन्वन्तरी रुग्णालयातील रत्नागिरी टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा १० वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा झाला. यावेळी व्यासपीठावर डॉ. तोरल शिंदे, डॉ. निलेश शिंदे, डॉ. निशिगंधा पोंक्षे उपस्थित होत्या. यावेळी डॉ. निलेश शिंदे म्हणाले हे आपल्या हातून घडले ते केवळ ईश्वरी ताकदीमुळेच आहे, अन्यथा इतके मोठे शिवधनुष्य पेलणे केवळ अशक्य होते. यासाठी अनेकांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले. तर डॉ. तोरल शिंदे यांनी यासाठी मिळालेली प्रेरणा, येणाऱ्या अडचणींबद्दल बोलताना सांगितले कि वाट चालताना अडथळे येणारच आहेत पण हि उपचारपद्धती कोकणात सुरु करायची आहे हे निश्चित झाल्यानंतर आम्ही प्रत्येक अडचणींचा सामना करत गेलो. आजवरच्या वाटचालीसाठी त्यांची त्यांचे पती डॉ. निलेश शिंदे, कुटुंबीय, सहकारी डॉक्टर्स आणि रुग्णालय कर्मचाऱ्यांचे आभार मानले. डॉ. पोंक्षे यांनी हॉस्पिटल आणि सेंटरचे व्यवस्थापन सांभाळताना आलेले अनुभव कथन केले.

यावेळी टेस्ट ट्यूब द्वारे अपत्य प्राप्ती झालेल्या पालकांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या तर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनीही मनोगत व्यक्त केले. या वर्धापन दिनानिमित्त स्लोगन आणि रील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यांचे बक्षीस वितरण यावेळी मान्यवरांच्या हस्ते झाले तर छोट्या चित्रफितीद्वारे टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या कामाचा आढावा दाखवण्यात आला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:37 PM 25/Sep/2024