राजापूर : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर नाणार रिफायनरीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. नवीन शासनाने नाणार येथेच रिफायनरीचा प्रकल्प मार्गी लावावा, अशी मागणी सुरू झाली आहे. नाणार परिसरातील जवळपास साडेआठ हजार एकर जमीन मालकांनी यापूर्वीच आपली संमती सरकारकडे नोंदवलेली आहे. आता महायुतीच्या सरकारने या जमीनमालकांच्या संमतीच्या आधारे
हा प्रकल्प नाणार परिसरामध्ये राबवावा, अशी मागणी महायुतीचे रत्नागिरी – सिंधुदुर्ग विधानसभा समन्वयक प्रमोद जठार यांनी केली आहे. कोकणातील पहिला रिफायनरी समर्थनाचा हजारो लोकांचा भव्य मोर्चा रत्नागिरी येथे काढण्यात आला होता. विल्ये डोंगरतिठा येथे हजारों समर्थकांचा भव्य मेळावा घेण्यात आला होता. याव्यतिरिक्त कित्येक छोटी-मोठी आंदोलने आणि हजारो एकरच्या जमीन मालक शेतकऱ्यांची संमती पत्रे ही नाणार प्रकल्पच्या समर्थनार्थ आलेली होती. सुकथनकर समिती भेटीच्या वेळी या परिसरातील समाजाच्या सर्व घटकातील मंडळींनी नाणार व विल्ये दशक्रोशी परिसरातून रिफायनरी समर्थनाची ठोस भूमिका मांडलेली होती.
यानंतर प्रकल्पाला विरोध असणारे नाणार गाव व काही वाड्या वगळून विल्ये दशकोशी रिफायनरी समर्थक परिसराचा आराखडाही तयार करण्यात आला आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये नाणार परिसरात रिफायनरीचे समर्थन करणाऱ्या महायुतीच्या पारड्यात येथील जनतेने भरभरून यश घातले आहे. याचाच अर्थ येथील जनतेने आता प्रकल्पविरोधाचा बागुलबुवा करून आपली राजकीय पोळी भाजणाऱ्या राजकीय शक्तींना दूर करून रोजगाराची कास धरणाऱ्या महायुती सरकारला हिरवा कंदील दर्शवलेला आहे. या सर्व बाबींचा विचार करून हा प्रकल्प लवकरात लवकर नाणार आपण सरकारकडे करणार आहोत, अशी माहिती पत्रकार परिषदेत विल्ये (नाणार) रिफायनरी समर्थक समितीतर्फे देण्यात आली. याप्रसंगी विल्ये रिफायनरी समर्थक समितीचे अविनाश महाजन, फारूख साखरकर, प्रल्हाद तावडे, सुहास मराठे, सदाशिव तांबडे, मन्सूर काझी, निलेश पाटणकर, विद्याधर राणे, अजीम चौगुले व इतर रिफायनरी समर्थक उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:35 PM 29/Nov/2024