आ. किरण सामंत यांनी केली राजापूर आगार व ओणी प्राथमिक आरोग्य केंद्राची पहाणी

राजापूर : राजापूर, लांजा साखरपा विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांनी बुधवारी राजापूरा दाखल होताच आपल्या भविष्यातील कार्यपध्दतीची चुणूक दाखविली आहे.

बुधवारी प्रशासकिय अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर उपस्थित झालेल्या प्रश्नांची तात्काळ सोडवणूक करण्यासाठी त्यांनी राजापूर आगारातील एकूणच वाहतुक व्यवस्था, आगार परिसर व सुलभ शौचालयाची पहाणी केली. त्यानंतर ओणी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देत तेथील पहाणी केली. यावेळी त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्षात माहिती घेत तेथील प्रलंबीत कामे मार्गी लावण्याची ग्वाही दिली.

बुधवारी आमदार सामंत राजापूरात दाखल झाले. यावेळी त्यांनी प्रशासकिय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला. यावेळी राजापूर आगारातील पाण्याचा प्रश्न, तसेच कमी असलेल्या गाडया, चालक वाहक व आगारातील सुलभ शौचालयाबाबतचे प्रश्न स्थानक प्रमुख सचिन मोरे यांनी त्यांना सांगितले. तर ओणी प्राथमिक आरोग्य केंद्रातील गैरसोयीबाबतही त्यांना आरोग्य विभागाकडून व ओणीतील पदाधिकाऱ्यांकडून माहिती देण्यात आली होती.

बैठक संपल्यानंतर आ. सामंत यांनी तात्काळ राजापूर आगारात प्रत्यक्षात भेट दिली व वस्तुस्थितीची पहाणी केली. यावेळी त्यांनी गाडया तसेच चालक वाहक कमतरतेचा प्रश्न आपण विभाग नियंत्रकांशी बोलुन सोडवू अशी ग्वाही दिली. तर पाण्यासाठी नवीन टाकी दिली जाईल असेही त्यांनी सांगितले. तर सुलभ शौचालयाबाबत असलेल्य तक्रारींचे निवारण करण्याबाबतही विभाग नियंत्रकांशी बोलू असे त्यांनी सांगितले.

त्यानंतर आ. सामंत यांनी ओणी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली व तेथील सेवा सुविधांची पहाणी केली. तर नव्याने आवश्यक असणाऱ्या सेवांची तसेच बांधकामाबाबत माहिती घेतली. यावेळी ओणी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. पराग मदने यांनी आरोग्य केंद्रातील कामकाजाबाबत माहिती दिली, तसेच आवश्यक त्या सेवा सुविधाबांबतही आ. सामंत यांच्याशी चर्चा केली. यावेळी अशोक बल्लाल, राजेश गेल्ये यांसह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.यावेळी आ. सामंत यांनी ओणी प्राथमिक आरोग्य केंद्रातील गैरसोयी दूर केल्या जातील व आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविल्या जातील अशी ग्वाही दिली.

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर, , शिवसेना उपजिल्हा प्रमुख अशफाक हाजू, भाजपा जिल्हा सरचिटणीस रवींद्र नागरेकर, शिवसेना शहर प्रमुख सौरभ खडपे, ओणीचे माजी पंचायत समिती सदस्य प्रतिक मटकर, वाटूळचे उपसरपंच विक्रम धावडे, गौरव सोरप, कमलाकर गुरव आदींसह ओणि विभागातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:01 29-11-2024