रत्नागिरी : कोणत्याही हुशार विद्यार्थ्याच्या उच्च शिक्षणामध्ये पैसे नसल्याने खंड पडू नये यासाठी आता हुशार, गरीब विद्यार्थ्यांना ‘पीएम विद्यालक्ष्मी योजने’चा आधार मिळणार आहे. अशा विद्यार्थ्यांना केवळ 3 टक्के व्याज अनुदानासह 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज विनातारण व विनाजामीनदार मिळणार आहे.
गरीब विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणामध्ये अनेकवेळा आर्थिक अडचणीचा अडसर येऊ शकतो. याची प्रचिती अनेकदा गरीब कुटुंबाला येते. सध्या या प्रकारच्या कर्जावर 8.4 टक्के व्याज होते. ते आता कमी होणार आहे. वार्षिक 4.5 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणार्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना शून्य टक्के व्याज दराने या विद्यालक्ष्मी योजनेचा लाभ मिळेल.
ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न 8.5 लाख रुपये आहे, त्यांना 3 टक्के दराने कर्ज मिळेल. यामध्ये केंद्र सरकार 75 टक्के अनुदान देणार असून, 25 टक्के कॅनरा बँक देणार आहे. उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी बहुतांशवेळा लाखो रुपयांचा खर्च होत असतो, अशावेळी तारण व जामीनदार यांचाही विषय पुढे येतो. आता या योजनेत तारण व जामीनदाराची आवश्यकता असणार नाही. विद्यार्थ्यांची शैक्षणिक कर्ज प्रक्रिया सुलभ करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. विद्यालक्ष्मी पोर्टलवर 84 प्रकारच्या शैक्षणिक कर्ज योजनांची माहिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने 6 नोव्हेंबरला या योजनेला मंजुरी दिली आहे. या योजनेमध्ये व्याज अनुदान, ई – व्हाऊचर आणि सेंट्रल बँक डिजिटल करन्सी वॉलेटद्वारे वितरित केले जाणार आहे. एकदा या पोर्टलवर लॉगीन केल्यानंतर स्क्रीनवरील डॅश बोर्डवर विद्यार्थ्यांना अर्ज करता येईल. आर्थिक अडचणींमुळे विद्यार्थी उच्च शिक्षणांपासून वंचित राहू नये, यासाठी ही योजना उपयुक्त ठरणार आहे.
अर्जाच्या स्थितीची माहिती ऑनलाईन
देशातील 860 उच्च शिक्षण संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेऊ इच्छिणार्या गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क आणि इतर खर्चाची संपूर्ण रक्कम मिळू शकते. कॉमन अॅप्लिकेशन पोर्टलवर अर्ज केल्यानंतर विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने त्यांच्या अर्जाची स्थिती जाणू शकतात.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:23 26-12-2024












