तरुणाईला थर्टी फर्स्टचे वेध..!

रत्नागिरी : थर्टी फर्स्टचा माहोल आता हळूहळू तयार होऊ लागला असून, तरुणाईला तर आतापासूनच त्याचे वेध लागले आहेत. थर्टी फर्स्टचा जल्लोष साजरा करण्यासाठी बेत आखू लागले आहेत.

प्रत्येकाच्या ग्रुपवर आता गेल्यावर्षी कसा जल्लोष झाला, यावर्षी थर्टी फर्स्ट कुठे अन् कसा साजरा करायचा याचे नियोजन सुरू झाले आहे. अलीकडे थर्टी फर्स्ट म्हणजे मोठा फेस्टिव्हल म्हणून साजरा केला जात आहे.

डिसेंबर महिना मध्यावर आला की थर्टी फर्स्टची चाहूल तरुणाईला लागते. थर्टी फर्स्टला अद्याप सात दिवसांचा कालावधी असला तरी तरुणाई उतावीळ झाल्याचे पाहायला मिळते. या उत्सवाला विधायक स्वरुप देण्याचा प्रयत्नही होत असतो. अंधश्रध्दा निर्मूलन व परिवर्तन व्यसनमुक्ती संस्था यांच्यावतीने तसेच सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडूनही पाश्चिमात्य सणाचे अनुकरण होऊ नये तसेच नवीन वर्षाची सुरुवात चांगल्या विधायक गोष्टींनी व्हावी, सामाजिक कार्याने व्हावी या हेतूने उपक्रम राबवले जातात.

दि. 31 डिसेंबरला संध्याकाळी सहा वाजल्यापासून जल्लोषाला सुरुवात होते. दुचाकी, चारचाकी गाडीतून दंगेखोरांची टोळकीच्या टोळकी समुद्र किनारी तेथीलच लाकूडफाटा गोळा करुन मांसाहारावर ताव मारला जातो. हे फॅड आता वाढले आहे. थर्टीफर्स्ट म्हटले की हुल्लडबाजी समीकरण होवून बसले आहे.

नववर्षाचे स्वागत करण्याच्या नावाखाली दारुचा महापूर वाहत असतो. हॉटेलमध्ये तर 31 डिसेंबरच्या रात्री पाय ठेवायला जागा मिळत नाही. त्यामुळे अनेकजण निसर्ग सानिध्यात नववर्षाचे स्वागत करण्यासाठी जातात. मात्र तेथे धिंगाणा घातला जात असून, पर्यावरणाचीही हानी केली जात असल्याने यावर्षी तरी त्यावर कठोर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

थर्टी फर्स्टचे फॅड वर्षानुवर्षे वाढतच चालले आहे. जल्लोप अन् मौजमजेसाठीच निमित्त शोधणारी तरूणाई थर्टी फर्स्टच्या जल्लोपात हरवून जाऊ लागली आहे. विशेषतः पर्यटनस्थळावर त्याला उधाण येते. जिल्ह्यातील सर्वच समुद्र किनारे, बीच आदी परिसरात थर्टी फर्स्ट साजरी करताना तरुणाई बेभान होत असते.

थर्टी फर्स्टवर पावसाचे सावट…
ऐन हिवाळ्यात राज्यात वादळी, वारा, विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यामुळे सध्या थर्टीफर्स्टवर पावसाचे सावट दिसून येत आहे. जर त्या दिवशी पाऊस आला तर उघड्यावर थर्टी फर्स्ट साजरा करण्याचा मूड ऑफ होणार असल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात पर्यटकांची संख्या वाढली…
नाताळची सुट्टी लागू झाल्याने सध्या जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर पर्यटकांची गर्दी दिसू लागली आहे. विशेषकरून समुद्र किनारे पर्यटकांनी फुलून गेले आहेत. त्याचबरोबर गणपतीपुळे, मार्लेश्वर या धार्मिक स्थळांनाही पर्यटक भेटी देत आहेत. यामुळे हॉटेल व्यावसायिकांनाही सुगीचे दिवस आले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:50 26-12-2024