खेड : जगबुडी नदीकिनारी असलेली स्मशानभूमी बनलेलीय मद्यपींचा अड्डा

खेड : शहरातील जगबुडी नदीकिनारी असलेली स्मशानभूमी मद्यपींचा अड्डा बनली आहे. स्मशानभूमीत असलेल्या झाडांखाली मद्यपींचा दिवस रात्र वावर सुरू असतो. रस्त्यालगत मद्याच्या बाटल्यांसह प्लास्टिक बाटल्यांचा खच पडला आहे. या मद्यपींवर कारवाईसाठी नगर प्रशासनाला सवडच मिळत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नगर परिषद हद्दीतील जगबुडी नदीकिनारी ३ स्मशानभूमी आहेत. एका स्मशानभूमीनजीक ३ महाकाय वृक्ष आहेत. या वृक्षांखाली अनेक जण विसावा घेण्यासाठी जातात. याचठिकाणी मद्यपींचा वावर देखील वाढला आहे. दिवसभर मद्यपी याच वृक्षांखाली मद्य रिचवत असल्याची बाब समोर आली आहे. मद्य रिचवल्यानंतर मद्याच्या बाटल्या फोडण्याचे प्रकार देखील केले जात आहे. यामुळे स्मशानभूमीत अंत्यसंस्कार दरम्यान ये-जा करणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

याच ठिकाणी मद्यपींपाठोपाठ काहीजण छुप्या पद्धतीने गांजा देखील ओढत असल्याची बाब समोर आली आहे. स्मशानभूमी मद्यपींचा अड्डा बनलेली असतानाही त्याकडे लक्ष देण्यास नगर प्रशासनाला अद्यापही सवड मिळालेली नाही. स्मशानभूमी सभोवतालचा परिसर अस्वच्छ करणाऱ्या मद्यपींवर नगर प्रशासनाने कारवाईसाठी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर नगर प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:09 PM 29/Nov/2024