संगमेश्वर : शेगांवचे संत श्री गजानन महाराज मंदिर धामणी, ता. संगमेश्वर प्रतिवर्षीप्रमाणे श्रींची पालखी घेऊन शेगांवी दाखल होत आहे. यावर्षी पालखी सोहळ्याचे तिसरे वर्ष असल्याने मोठ्या संख्येने भाविकांनी याचे साक्षीदार व्हावे अशी अपेक्षा मंदिर समितीच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आली आहे. दि. ८ डिसेंबर रोजी पालखीचे नागपूरकडे जाणाऱ्या रेल्वेने संगमेश्वर रेल्वे स्थानकावरून प्रस्थान होणार असून दि. ९ डिसेंबर रोजी पालखी शेगांवी पोहचणार आहे.
दि. १० डिसेंबर रोजी श्री क्षेत्र शेगांव येथे शितलनाथ मंदिर ते श्री गजानन महाराज मंदिर असा श्रींच्या पालखीचा अभूतपूर्व दैदिप्यमान सोहळा संपन्न होणार आहे. यावेळी मंदिराच्या पश्चिम द्वारावर पालखीचे स्वागत करण्यात येणार आहे. श्री गजानन महाराज मंदिर, शेगांवच्या वतीने विणाधारी, भालदार-चोपदार-दंडधारी आणि दिंडीप्रमुखांचा भव्य सत्कार करण्यात येणार आहे. यानंतर उपस्थित सर्व भाविकांना महाप्रसादाचा लाभही मिळणार आहे. दि. ११ डिसेंबर रोजी शेगांव दर्शनाचा आनंद भक्तगणांना घेता येणार आहे. सायंकाळी परतीचा प्रवास सुरु होईल. दि. १२ डिसेंबर रोजी श्री गजानन महाराज मंदिर, धामणी येथे परिक्रमा संपन्न होणार आहे.
या परिक्रमेचा लाभ भाविकांनी घ्यावा यासाठी शेगांवचे संत श्री गजानन महाराज मंदिर, धामणी यांच्या वतीने श्री गजानन महाराज भक्त श्री. गोपीनाथ मधुकर यादव यांनी आवाहन केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:47 PM 29/Nov/2024