खेड : तालुक्यातील तळे चिंचवाडी येथे लम्पी रोगाच्या प्रादुर्भावाने शेतकरी चिंताग्रस्त बनले आहेत. येथील काशिराम धाकू दोडेकर यांच्या मालकीची जर्सी गाय अज्ञात रोगाने आजारी असून मृत्यूशी झुंज देत आहे. तळेतील केंद्रात पशुवैद्यकीय अधिकारीच उपलब्ध नसल्याने एका खासगी रुग्णालयात गायीवर उपचार करण्यात आले.
तालुक्यात लम्पीच्या आजाराने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. भात कापणीची कामे आटोपल्याने शेतकरी जनावरांना मोकाट सोडत आहेत. अन्य गावातील जनावरांचा येथे वावर वाढल्याने लम्पीचा प्रादुर्भाव निर्माण झाला असल्याचा अंदाज शेतकऱ्यांनी वर्तवला आहे. एकीकडे लम्पी आजाराचा फैलाव होत असताना दुसरीकडे मात्र तळे येथील पशुवैद्यकीय केंद्रात आजारी जनावरांवर उपचार करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारीच उपलब्ध होत नाहीत. यामुळे आजारी जनावरांवर खासगी रुग्णालयातच उपचार करावे लागत आहेत. काशिराम दोडेकर यांच्या मालकीची जर्सी गाय गेल्या ७-८ दिवसांपासून आजारी आहे. या गायीवरही पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे खासगी रुग्णालयातच उपचार केले आहेत.
सद्यस्थितीत जर्सी गाय शेवटची घटका मोजत असल्याची बाब समोर आली आहे. या बाबत ग्रामपंचायत सदस्य शत्रुघ्न मोरे यांनी ग्रामपंचायतीला कल्पना दिली. मात्र पशुवैद्यकीय अधिकारीच उपलब्ध होत नसल्याने अन्य शेतकरीही चिंताग्रस्त बनले आहेत. या प्रकाराची गटविकास अधिकाऱ्यांनी गंभीर नोंद घेवून संबंधित पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:11 PM 02/Dec/2024