रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा गाव विकास समितीकडून चिपळूण मतदारसंघात उमेदवार दिला जाणार असून प्राथमिक चर्चेत असणाऱ्या तीन नावांपैकी अॅड. सुनील खंडागळे व सौ. अनघा कांगणे यांच्या नावाची शिफारस कोअर कमिटीने संघटनेचे नेतृत्व अध्यक्ष उदय गोताड व संघटप्रमुख सुहास खंडागळे यांच्याकडे केली आहे. तशी माहिती संघटनेचे सरचिटणीस सुरेंद्र काब्दुले यांनी दिली आहे.
संघटनेचे उपाध्यक्ष व कृषी तज्ज्ञ राहुल यादव यांच्यावर कोअर कमिटीकडून विधानसभा निरीक्षकाची जबाबदारी सोपवण्यात आली असून शिफारस केलेल्या उमेदवारांबाबत अंतिम निर्णय संघटनेच्या नेतृत्वाने लवकरात लवकर घ्यावा अशी विनंती कोअर कमिटीमार्फत अध्यक्ष उदय गोताड व संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांना करण्यात आली आहे.
अॅड. सुनील खंडागळे व सौ. अनघा कांगणे या कुणबी समाजातील असून बहुसंख्येने असणाऱ्या व राजकीयदृष्ट्या दुर्लक्षित असणाऱ्या कुणबी समाजाला प्रतिनिधित्व देण्याची भूमिका यावेळी गाव विकास समितीने घेतली आहे.
गाव विकास समिती वेळोवेळी संगमेश्वर तालुका, रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख प्रश्नांवर आवाज उठवून शासन यंत्रणेला जाब विचारात असते. या संघटनेकडून या विधानसभा निवडणुकीत उमेदवार दिले जाणार असून चिपळूण मतदारसंघात विधानसभेची तयारी सुरू करण्यात आली आहे. समितीकडून अॅड. वोकेट सुनील खंडागळे, कृषी तज्ज्ञ राहुल यादव व महिला उपाध्यक्ष अनघा कांगणे यांच्या नावांची चर्चा संघटने अंतर्गत होती. राहुल यादव कृषी तज्ज्ञ असून ते संघटनेचे प्रमुख पदाधिकारी व उपाध्यक्ष असल्याने त्यांच्यावर विधानसभा निरीक्षक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. उमेदवारीसाठी चर्चेत असणाऱ्यामधील अॅड. सुनील खंडागळे व अनघा कांगणे या दोघांपैकी एकाला उमेदवारी मिळणार असल्याने यावेळी चिपळूण मतदारसंघातून कुणबी समाजाला गाव विकास समितीमार्फत प्रतिनिधित्व दिले जाईल.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:40 26-09-2024