कोल्हापूर : साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पीठ असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचा रविवारी पंचगंगा घाटावर अवभृत स्नानविधी, पालखी सोहळा उत्साहात पार पडला. ‘जय देवी अंबाबाई’च्या जयघोषांनी संपूर्ण परिसर भक्तिरसात डुंबून गेला
मंदिरात अधिक मासानिमित्त आयोजित धार्मिक अनुष्ठानांच्या पार्श्वभूमीवर रविवारी देवीचा अवभृत स्नानविधी, पालखी सोहळा, स्नानविहार आणि नौकाविहार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. पंचगंगा घाटावर हा भक्तिमय सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली.
मंदिरात अधिक मासानिमित्त विशेष धार्मिक कार्यक्रमांचे आयोजित केले आहेत. त्यानिमित्त हक्कदार श्रीपूजक मंडळातर्फे गरुड मंडपात देवता स्थापना, पुण्यवाचन, होम-हवन, अभिषेक, आरतीसह अनेक पूजाविधी सुरू आहेत.
तीन दिवस झालेल्या यज्ञविधीनंतर रविवारी सकाळी देवीची उत्सवमूर्ती विधीवत पूजन करून पालखीतून पंचगंगा घाटावर नेण्यात आली. त्यावेळी मार्गावर ठिकठिकाणी भाविकांनी फुलांच्या पायघड्या घातल्या. मार्गावरील मंडळ, संस्था आणि भाविकांनी फुलांचा वर्षाव केला. पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि मंत्रोच्चारात पालखी सोहळा झाला.
नदी घाटावर देवीची आणि पंचगंगेची विधीवत पूजाअर्चा झाली. त्यासह ओटी भरण्याचा पारंपरिक विधीही पार पडला. त्यानंतर, देवीचा अवभृत स्नानविधी पार पडला. स्नानविहार, नौकाविहार सोहळा पाहण्यासाठी शेकडो भाविकांची घाटावर गर्दी झाली. त्यानंतर, देवीच्या दर्शनासाठी, पालखी स्वागतासाठी घाट परिसरात अलोट गर्दी झाली. सोहळ्यानंतर पालखी पुन्हा मंदिरात परत आणण्यात आली. अधिक मास सुरू झाल्यापासून मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी मंदिरात आहे.
चौघे बुडताना वाचले
श्री अंबाबाईच्या स्नानविधीच्या वेळी पंचगंगा घाटावर गर्दीच्या वेळी चौघेे जण पाण्यात बुडाले. त्यावेळी पंचगंगा विहार मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तत्काळ धाव घेऊन त्यांना वाचवले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:59 25-05-2026














