चिपळुण शहरात गवा रेड्याचा मुक्त संचार

चिपळूण : चिपळुणातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कापसाळनजीक मध्यरात्रीनंतर गवा रेड्याचा मुक्त संचार पाहायला मिळाला आहे. काही काळ वाहनचालकांच्या मनात धडकी भरवली. गवा रेडा म्हणजेच रानरेडा महामार्गावर प्रथमच निदर्शनास आल्याने वन्यप्राण्यांचा चिपळूण शहरात वावर वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

चिपळूण शहर परिसरात वन्यप्राण्यांचा वावर अनेकवेळा निदर्शनास आला आहे. चार ते पाच वर्षांपूर्वी शहरातील उक्ताड परिसरात जंगलमय असलेल्या डोंगर उतारावरील एका बंद घरामध्ये बिबट्याने शिरकाव केला होता. शहराला चारही बाजूने जंगलमय डोंगराने वेढले आहे. तीस टक्के डोंगरभागात उतारावर नागरी वस्ती आहे. त्यामागे जंगल परिसर आहे. सहा ते सात वर्षांपूर्वी एक गवा रेडा थेट शहरातून मार्गक्रमण करीत रामतीर्थ स्मशानभूमी मार्गे मुरादपूर, शंकरवाडी दरम्यान निदर्शनास आला होता. यावेळी मध्यरात्रीच्या सुमारास बिथरलेल्या गव्याने काही घरांच्या प्रवेशद्वारांची मोडतोड करून गांधारेश्वर नदी परिसरातून महामार्गावर नजिकच्या जंगलमय परिसरात निघून गेला.

शहरातील विंध्यवासिनी देवी मंदिर परिसरातील जंगलात एक बिबट्याची मादी पाच बछड्यांसह आढळून आली. वन विभागाने काही काळ सीसीटीव्ही लावून माणसांचा वावर बंद केला होता तर आता या घटनेनंतर थेट महामार्गावरच एक भला मोठा गवा रेडा कामथे, कापसाळच्या दरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास वावरताना निदर्शनास आला. काही काळ या गवा रेड्याने वाहनचालकांच्या मनात धडकी भरवली. महामार्ग ओलांडून महामार्गावरील बॅरिकेटस्वरून उडी मारून नजिकच्या झुडपात हा रेडा निघून गेला. या बाबत वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी योग्य ती दक्षता घ्यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:23 AM 03/Dec/2024