“भारत जगाची प्रयोगशाळा” : बिल गेट्स

Bill Gates : मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांचा रीड हॉफमनसोबतचा अलीकडचा पॉडकास्ट खूप चर्चेत आला आहे. या पॉडकास्टमध्ये गेट्स यांनी भारताबद्दल असे काही वक्तव्य केलं आहे ज्यामुळे अनेक भारतीय नाराज झालेत.

त्यांनी भारताला ‘एक प्रकारची प्रयोगशाळा’ म्हटलं आहे. ज्यामुळे लोकांना असे वाटू लागले की ते भारताला कमी लेखत आहेत. बिल गेट्स यांच्याविरोधात सोशल मीडियावर मोहिम देखील सुरु करण्यात आली असून नेटकरी त्यांच्या वक्तव्याचा निषेध करत आहेत.

अब्जाधीश बिल गेट्स यांनी भारताबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन त्यांच्यावर असंवेदनशीलतेचा आरोप करण्यात आला. रीड हॉफमनसोबतच्या पॉडकास्ट दरम्यान बिल गेट्स यांनी भारताला गोष्टी वापरण्यासाठी असलेली प्रयोगशाळा असं म्हटल्याने एक्स सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जातोय.

भारत हा एक असा देश आहे जिथे आरोग्य, पोषण आणि शिक्षण यासारखी अनेक आव्हाने आहेत. मात्र भारत या आव्हानांना तोंड देत आपल्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत करत आहे. मला वाटते की २० वर्षांनी भारत खूप प्रगती करेल. भारत एक प्रकारची प्रयोगशाळा आहे, जिथे आपण नवीन पद्धती वापरून पाहू शकतो. जर या पद्धती भारतात काम करत असतील तर जगातील इतर देशांमध्येही त्या लागू केल्या जाऊ शकतात, असं बिल गेट्स यांनी म्हटलं आहे.

“आमचे फाउंडेशन अमेरिकेनंतर भारतात सर्वात जास्त काम करते. आमचे बहुतेक नवीन प्रकल्प फक्त भारतातच सुरू होत आहेत. आम्ही भारतात अनेक नवीन पद्धती वापरत आहोत,” असंही बिल गेट्स म्हणाले.

दरम्यान, बिल गेट्स यांनी केलेल्या वक्तव्यावरुन नेटकऱ्यांकडून प्रतिक्रिया येत आहे. “भारत एक प्रयोगशाळा आहे आणि आम्ही भारतीय बिल गेट्ससाठी प्रयोग करणारे उंदीर आहोत. या व्यक्तीने सरकारपासून विरोधी पक्ष आणि मीडियापर्यंत सर्वांनाच आपल्या प्रभावाखाली घेतले आहे. त्यांचे कार्यालय कोणत्याही नियम-कायद्यांशिवाय येथे सुरू आहे आणि आमच्या शिक्षण व्यवस्थेने त्यांना हिरो बनवले आहे. आम्हाला कधी जाग येईल माहीत नाही,” असं एका युजरने म्हटलं आहे.

तर दुसर्‍या एका युजरने भारतात राहणारे लोक बिल गेट्स यांच्या प्रयोगशाळेसाठी नमुने आहेत.ही क्लिप योग्य वाटत नाही, तुम्ही ती कोणत्या संदर्भात ऐकलीत तरीही, असं म्हटलं आहे. आणखी एका युजरने, भारतात बिल गेट्सच्या विरोधात एवढा विरोध का होतोय हे समजत नाही. भारतात कोणतीही लस वापरली जात नाही, असं म्हटलं.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:09 03-12-2024