एआयमुळे ९७ दशलक्ष नवीन नोकऱ्या मिळणार : डॉ. भूषण केळकर

रत्नागिरी : एआय टेक्नॉलॉजीचा परिणाम संपूर्ण मानवी जीवनावर होणार आहे. नोकरी, व्यवसाय, शिक्षण, आरोग्य- वैद्यकीय, कला अशा सर्वच क्षेत्रांत कमी-अधिक प्रमाणात परिणाम जाणवू लागला आहे.

एआयमुळे ९७ दशलक्ष नवीन नोकऱ्या मिळणार आहे, असे प्रतिपादन एआय तज्ज्ञ डॉ. भूषण केळकर यांनी केले.

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीची बारटक्के इन्स्टिट्यूट व गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने डॉ. केळकर यांचे व्याख्यान गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात आयोजित केले होते. त्यावेळी ते बोलत होते. विद्यार्थ्यांनी डिग्री घेऊन नोकरी मिळेल, ती कायमस्वरूपी असेल अशा भ्रमात राहू नये. म्हणून महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच ऑनलाइन, चांगल्या विद्यापीठाचे मोफत कोर्स करून घ्यावेत, असे आवाहन त्यांनी केले.

डॉ. केळकर यांनी विद्यार्थी किंवा तरुण, ज्येष्ठांनीही काय करायला पाहिजे याचे सविस्तर मार्गदर्शन केले. विश्लेषणापासून संश्लेषणाकडे जाणे आवश्यक आहे. सातत्याने शिकणे, लर्न अन् लर्न रिलर्न, किमान दोन विषयांत ज्ञान मिळविणे, Data Analysis करायला शिकणे, डिजिटल प्रेझेन्स हवा, सॉफ्ट स्किल्स शिका, डिझाइन थिंकिंग, पायथन प्रोग्रामिंग, परकीय भाषा शिका, अनुभवावर आधारित शिक्षण घ्या. सामान्य ज्ञानासाठी वृत्तपत्रे वाचा, ज्या समाजात राहतो त्या समाजाला काही देणे लागतो, ही भावना ठेवून शिका. नियमित व्यायाम, प्राणायाम, ध्यानधारणा कराच तर एआयच्या जगात टिकाव लागेल, अशा महत्त्वाच्या टिप्स त्यांनी दिल्या.

डॉ. केळकर म्हणाले, २०२५ मध्ये ८४ दशलक्ष नोकऱ्या एआयमुळे जाणार आहेत. परंतु त्याच वेळी ९७ दशलक्ष नव्या नोकऱ्या निर्माण होणार आहेत. ५४ टक्के व्यावसायिकांना रिस्कीलिंग करावे लागेल. दहा लाख डेटा सायंटिस्टच्या नोकऱ्या वाढल्या आहेत. नवनवीन शिकलो तरच त्यात संधी मिळेल. एआय म्हणजे त्सुनामी लाट आहे. त्या लाटेवर स्वार व्हायचे असेल तर अनेक गोष्टी कराव्या लागतील. समजून घ्या व शिका आणि त्यासोबत राहा, असेच मी म्हणतो. त्यांनी १०-८०-१० हे सूत्र बनवले आहे, म्हणजे एआयचा वापर करताना योग्य प्रश्न विचारा, माहिती मिळेल व त्या माहितीचा योग्य उपयोग करा. विद्यार्थ्यांनी linkedin या सोशल मीडियावर खाते काढावे. ज्यामधून अनेकांना नोकरीच्या संधी मिळू शकतात.

यावेळी संस्थेच्या कार्याध्यक्ष शिल्पा पटवर्धन, कार्यवाह सतीश शेवडे, सहकार्यवाह श्रीकांत दुदगीकर, प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, बारटक्के इन्स्टिट्यूटच्या शालेय समिती अध्यक्ष डॉ. कल्पना मेहता, सल्लागार समितीचे अध्यक्ष सीए वरद पंडित, डॉ. मधुरा केळकर आदी प्रमुख उपस्थित होते.

शिल्पाताई म्हणाल्या की, माझ्याकडे असलेल्या ज्ञानातून पुढे जायचं आहे. मला काय करायचं आहे, मी काय करू शकतो, हे कळण्यासाठी डॉ. केळकर यांचे मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचे आहे. डॉ. मेहता यांनी प्रास्ताविकामध्ये बारटक्के इन्स्टिट्यूटची माहिती देऊन डॉ. केळकर यांच्या संस्थेसोबत काही अभ्यासक्रम राबवण्याबाबत विचार व्यक्त केले. डॉ. साखळकर यांनी महाविद्यालयाची माहिती दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:55 05-12-2024