लांजा : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाणदिनी रत्नागिरी येथील पूर्ण कृती पुतळ्याजवळ मध्यरात्री तालुक्यातील हजारो नागरिक आदरांजली वाहण्यासाठी येत असतात. यावेळी येताना नागरिकांनी एक वही व पेन असे शैक्षणिक साहित्य सोबत आणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शैक्षणिक पद्धतीने अभिवादन करूया, असे आवाहन सावित्रीबाई फुले बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण असून शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, असा मूलमंत्र दिला. बाबासाहेबांचा हा मूलमंत्र गेली वर्षानुवर्षे आंबेडकरी समुदाय प्राण प्राण्याने जपतो आहे.
मुंबई चैत्यभूमीवर आणि नागपूर दीक्षाभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येणारे नागरिक प्रकर्षाने वैचारिक पुस्तकांची खरेदी करताना आपल्याला दिसतात. शिक्षणाचे महत्त्व आज प्रत्येक माणूस जाणून आहे. त्याचाच एक भाग म्हणून एक वही एक पेन हे अभियान सुरू केले असल्याचे सावित्रीबाई फुले बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने सांगितले. सिम्बॉल ऑफ नॉलेज अशी ओळख असलेल्या डॉ. बाबासाहेब यांना अभिवादन करण्यासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून अनुयायी रत्नागिरी येथे येत असतात. अनुयायांकडून मेणबत्ती, अगरबत्ती, पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले जाते. या साहित्याऐवजी एक वही आणि पेन आणल्यास ते गरजू मुलांचे उपयोगात येऊ शकते या अभियानाची जनजागृती संस्थेच्या तरुणांकडून करण्यात येत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:24 AM 05/Dec/2024