रत्नागिरी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे व युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय, भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रत्नागिरी व नेहरू युवा केंद्राच्या सहकार्याने आयोजित जिल्हास्तरीय युवा महोत्सव २०२४ मध्ये गोगटे-जोगळेकर कॉलेजच्या संगणक शास्त्र विभागातील द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी लक्षणीय यश संपादन केले आहे.
राझी नासिर साखरकर आणि मोहम्मद सामी राजापूरकर यांनी विज्ञान मेळा प्रदर्शन स्पर्धेत सहभाग घेतला. त्यांनी सादर केलेल्या “Implementation of LDR Sensor in Real Life” या प्रकल्पाने प्रेक्षकांचे तसेच परीक्षकांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणामुळे ग्रुप इव्हेंट प्रकारामध्ये त्यांनी तृतीय क्रमांकाचे बक्षीस, ट्रॉफी आणि प्रमाणपत्र पटकावले.
स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील विविध शाळा व महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला होता. ही स्पर्धा दिनांक ३० नोव्हेंबर २०२४ रोजी श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय, साळवी स्टॉप, रत्नागिरी येथे पार पडली. या विद्यार्थ्यांच्या यशामुळे गोगटे-जोगळेकर कॉलेजचे नाव जिल्हास्तरीय पातळीवर उंचावले आहे. त्यांची मेहनत, सर्जनशीलता आणि सादरीकरण कौशल्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे.
कॉलेजचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर सर, विज्ञान विभागाच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी मॅडम, तसेच संगणक शास्त्र विभागाच्या समन्वयक श्रीमती अनुजा घारपुरे मॅडम यांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. संगणक शास्त्र विभागाचे विभागप्रमुख श्री अमोल सहस्रबुद्धे आणि विभागातील प्राध्यापक वर्ग यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:27 05-12-2024