भाज्यांची महागाई; लसूण, कांदेसह बटाटे महाग

मंडणगड : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ सारख्या योजनेतून एकीकडे महिलांना आर्थिक पाठबळ दिले जात असतानाच स्वयंपाकघरातील दैनंदिन जीवनामध्ये लागणारा भाज्या, डाळी कडधान्यांच्या वाढत्या किमतीमुळे महिलांमध्ये तीव्र नाराजी पसरू लागली आहे. विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये महायुतीला लाडक्या बहिणीने भरभरून दिल्याचा दावा केला जातोय. मतदानानंतर मात्र महाग झालेली लसूण लाडक्या बहिणींच्या डोळ्यांमध्ये पाणी आणत असल्याची प्रतिक्रिया महिलांमध्ये व्यक्त होत आहे.

सध्या बाजारपेठेत कोणताही भाजीपाला किलोला ५० ते ६० रुपयांच्या खाली मिळत नाही. भाज्यांबरोबर डाळी, कडधान्यही महागले आहेत. डाळींनी सव्वाशे रुपयांच्या पुढे मजल मारली आहे. सर्वच कडधान्ये महागली आहेत. त्यामुळे गृहिणींचे महिन्याचे बजेट विस्कळीत झाले आहे. महागाईमुळे परजिल्ह्यातून येणाऱ्या भाजीपाल्यांची आवकही रोडावलेली आहे. त्यामुळे भाज्यांचे दरही वधारलेले दिसून येत आहेत. वांगी, घेवडा, फ्लॉवर, फुलकोबी, गाजर, काकडी आदींचे दर अर्धा किलोला ३० रुपये ते ५० रुपयांच्या घरात आहेत. टोमॅटो ५० रुपये तर फरसबी आणि मटार ने २०० ची मजल गाठली आहे.लसूण ३५० ते ४०० रु. किलो, कांदे ६० रु. किलो, बटाटे ४५ रु. किलो आहेत.

एका कुटुंबात सरासरी दोन भाज्या दिवसाला होतात किमान अर्धा किलो भाजी प्रतिदिन लागते. त्यामुळे दोन वेगवेगळ्या भाज्या घ्यायच्या झाल्या तरी दिवसाला शंभर रुपयांची भाजी लागतेच. डाळी आणि कडधान्यांवर दिवस ढकलायचा तरी त्यांच्याही किमती हाताबाहेर गेल्याने गृहिणींकडून स्वयंपाकघरात हात आखडता घेतला आहे. दहा रुपयांना मिळणारी कोथिबीर, आले, मिरच्यांचा वाटा आता वीस रुपयांच्या पुढे गेला आहे. महत्त्वाचं म्हणजे लसणाचे दर साडेतीनशे रुपये किलोच्या पुढे गेले असून, पाव किलोसाठी शंभर रुपये मोजावे लागत आहेत. तालुक्यामध्ये चार महत्त्वाच्या ठिकाणी आठवडा बाजार भरतात. यामध्ये मंडणगड, कुंबळे, देव्हारे, म्हाप्रळ आणि आता नव्याने सुरू झालेला भिंगळोली येथील आठवडा बाजारामध्ये घाऊक दराने भाज्यांची खरेदी करण्यासाठी गृहिणींची गर्दी झालेली दिसते. मात्र, या बाजारातही भाज्यांचे आणि कडधान्यांचे दर वाढल्याने गृहिणींमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

मेस उद्योगालाही महागाईचा फटका
बाजारातील महाग झालेल्या भाजीपाल्यांचा थेट परिणाम मेस उद्योगालाही बसला आहे. जेवणाचे डबे, मेस चालवणाऱ्या महिलांच्या गृह उद्योगावरही महागाईचा परिणाम झाला आहे. जेवणाच्या डब्यांचे दर नाईलाजाने वाढवावे लागत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:15 PM 05/Dec/2024