खेड : आंबडवे ते राजेवाडी राष्ट्रीय महामार्गाचे काम अर्धवट अवस्थेत

मंडणगड : आंबडवे ते राजेवाडी राष्ट्रीय महामार्गाचे काम अर्धवट अवस्थेत ठेवल्याने वाहनचालकांसह प्रवाशांना अपघात होऊन दुखापती होत आहेत. तुळशी येथे पावसात खचलेला कॉक्रिट रस्ता अद्याप दुरुस्त न केल्याने गाड्या हवेत उडून जोरात आदळण्याचे प्रकार घडत असून यात प्रवाशांना गंभीर मार बसत आहे; मात्र याकडे राष्ट्रीय महामार्ग विभागाने दुर्लक्ष केले आहे.

२०१६ ला सुरू झालेल्या आंबडवे लोणंद या राष्ट्रीय महामार्गावरील महाड येथील राजेवाडी ते आंबडवे या सुमारे साठ किमी अंतरात मार्गाचे नूतनीकरण रुंदीकरणाबरोबर कॉक्रिटीकरणाने होत आहे. खूप विलंब होत असलेल्या या मार्गाचे काम सध्या चर्चेत झाले. पर्यटनाबरोबर दळणवळणासाठी हा मार्ग महत्त्वपूर्ण ठरेल; मात्र भविष्यकालीन वाढ़ती रहदारी आणि लोकवस्ती, वाढते शहरीकरण लक्षात घेऊन महामार्ग प्राधिकरणाने मार्गाचे काम सुस्थितीत व गुणवत्तापूर्ण करणे गरजेचे आहे व त्यासाठी तालुकावासीय आग्रही आहेत. गत सहा वर्षात हा प्रकल्प केंद्र शासनाच्या अखत्यारीत असतानाही रखडला. काम पूर्ण करण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी आवश्यक असताना आठ वर्षे झाली तरी रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे नागरिक महामार्गाने निर्माण केलेल्या समस्यांना आठ वर्षे सामोरे जात आहेत. सुरवातीच्या काळात साधारण दीड ते दोन वर्षांनी कामाचे ठेकेदार बदलण्यात आले. विद्यमान ठेकेदाराची दोन वर्षापूर्वी नियुक्ती झाल्यापासून रस्त्याचे काम सुरू केले तरी ते सध्या धीम्यागतीने सुरू असून जागोजागी अर्धवट अवस्थेत ठेवले आहे.

कामास विलंब, व्यापारी चिंतेत
महामार्गाच्या विस्तारात रस्त्यानजीकचे शहरातील बहुतांश व्यापारी दुकानांवर गदा पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यांचे सीमांकन होऊनही शहरातील कामास कधी सुरुवात होणार याविषयी अद्याप स्पष्टता नसल्याने व्यापाऱ्यांसह शहरवासीय चिंतेत आहेत. मार्गाच्या कामात रस्त्त्याची रुंदी किती यावरून बाजारपेठेसह वस्त्यांमध्ये अनेक तर्क लावत चिंता व्यक्त केली जात आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार यांच्याकडून येथील भौगोलिक परिस्थितीचे अवलोकन करून गुणवत्तापूर्ण कामांची लोकांची अपेक्षा गैर नाही. भिंगलोळी ते मंडणगड रस्ता वाहतुकीस योग्य राहिलेला नाही. त्याबाबत नागरिक तक्रारी करूनही दखल घेतली जात नाही.

भौगोलिक परिस्थितीकडे दर्लक्ष
नूतनीकरणात स्थानिकांची मागणी, भौगोलिक रचना यांचा विचार करण्यात यावा, अशा मागणीला जोर धरला असला तरी स्थानिकांच्या मागण्या व सूचनांकडे संबंधितांनी नेहमीच दुर्लक्ष केले आहे. मार्गाची निर्मिती होत असताना अनेक ठिकाणी रस्ते वाहतूक सुरक्षेची काळजी घेण्यात आली आहे का, याबाबत सध्या शंका आहेत. रस्त्यामधील अनेक धोकादायक वळणे, चढ-उतार अनेक ठिकाणी तशीच ठेवण्यात आलेली आहेत. रस्त्याच्या बाजूने उभी केलेली गटारे ही भविष्यकाळात कळीचा मुद्दा ठरतील की काय, अशीही शंका निर्माण होते. कारण, यातील सांडपाण्याचा निचरा कोठे होणार आहे, याचे उत्तर मिळालेले नाही.

तुळशी येथे उतारावरील खचलेला रस्ता अंधारात दिसून येत नसल्याने गाड्या आदळून प्रवाशांना गंभीर दुखापती होत आहेत तसेच यातून वाहनचालक आणि प्रवासी यांच्यात वादावादी होण्याचे प्रकार वाढले आहेत; मात्र याला जबाबदार असणाऱ्या ठेकेदार आणि प्राधिकरण यांना त्याचे सोयरसूतक नाही. अर्धवट कामे, सुरक्षेची न घेण्यात आलेली काळजी यामुळे हा मार्ग मोठ्या अपघाताला कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे. – सुधाकर घोसाळकर, तुळशी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:48 PM 05/Dec/2024