डॉ. पंजाबराव देशमुखांचे संत तुकाराम, छत्रपती शिवराय प्रेरणास्त्रोत : डॉ. राजेश मिरगे

सावर्डे : संत तुकाराम व छत्रपती शिवाजी महाराज या दोन महान विभूतींच्या प्रेरणेतूनच शेती, शेतकरी आणि बहुजन वर्ग हाच डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या कार्याचा रोडमॅप राहिला आहे, असे प्रतिपादन शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय अमरावती येथील मराठी विभागप्रमुख डॉ. राजेश मिरगे यांनी केले.

लोकमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षाचे औचित्य साधून सावर्डे (ता. चिपळूण) येथील कला व विज्ञान महाविद्यालयात विशेष अतिथी व्याख्यानाप्रसंगी ‘लोकमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख समग्र समाजक्रांती आणि भारतीय संविधानातील त्यांचे योगदान’ या विषयावर ते बोलत होते. महाविद्यालयाचे प्राचार्य टी. वाय. कांबळे यांनी प्रमुख अतिथी शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एल. कुलट आणि प्रमुख वक्ते डॉ. राजेश मिरगे यांचे आपल्या मनोगतामध्ये डॉ. मिरगे म्हणाले की तत्कालीन अठरापगड बहुजन समाजातील लोकांच्या मनात धर्मातील रुढी, परंपरा, कर्मकांडे यांचे गारुड रुतून बसल्यामुळे या बहुजन समाजाचे जीवन अत्यंत कष्टप्रद दुःखी व दयनीय बनले होते. म्हणून धर्म हा माणसासाठी आहे की, धर्मासाठी माणूस आहे? याची चिकित्सा करण्याकरिता त्यांनी इंग्लंडमधील एडनबरो विद्यापीठातून ‘वैदिक वाङ्मयातील धर्माचा उगम व विकास’ या विषयातून संशोधन करून धर्माची चिकित्सा केली. त्या काळात धर्मावर सखोल चितन व चिकित्सा करणारे डॉ. पंजाबराव देशमुख हे भारतातील पहिली व्यक्ती होते.

प्रास्ताविकामध्ये प्राचार्य डॉ. ए. एल. कुलट यांनी डॉ. पंजाबरावांनी स्थापन केलेल्या शिवाजी शिक्षण संस्थेविषयी थोडक्यात माहिती सांगितली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य टी. वाय. कांबळे यांनी भूषवले तर सूत्रसंचालन प्रा. सुनील जावीर यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:06 PM 05/Dec/2024