रत्नागिरीत जिल्हास्तरीय युवा महोत्सव उत्साहात

रत्नागिरी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, नेहरू युवा केंद्र व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय युवा महोत्सव २०२४-२५ नुकताच उत्साहात संपन्न झाला. युवकांचा सर्वांगीण विकास, परंपरा जतन करणे, कलागुणांना वाव देणे यासाठी जिल्हा, विभाग, राज्य, व राष्ट्रीय स्तरावर युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे उद्घाटन उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, सागर पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून करण्यात आले. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्र.जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे, नेहरू युवा केंद्राचे मोहितकुमार सैनी, क्रीडा मार्गदर्शक सचिन मांडवकर, अक्षय मारकड, गणेश जगताप, गणेश खैरमोडे, राज्य क्रीडा मार्गदर्शक आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक रत्नागिरीचे प्र.जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. शिंदे यांनी केले. तसेच नेहरू युवा केंद्राचे रत्नागिरी जिल्हा समन्वयक श्री. सैनी यांनी कलेला फक्त कलेशी सिमित न ठेवता त्याच्याकडे करिअर म्हणून बघण्याबाबत व तशी वाटचाल सुरू ठेवण्याबाबतचे मार्गदर्शन केले. श्रीमती साठे यांनी युवकांना जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याबाबत तसेच कला गुणांचा आपल्या जीवनात कसा उपयोग होतो याबाबत आपले मनोगत व्यक्त करून युवकांना प्रोत्साहीत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋतिक चव्हाण यांनी केले तसेच श्री. खैरमोडे यांनी आभार प्रदर्शन केले.

यावेळी विज्ञान प्रदर्शन, लोकनृत्य, लोकगीत, कथालेखन, कवितालेखन, चित्रकला स्पर्धा, वत्कृत्व स्पर्धा, मोबाईल फोटोग्राफी स्पर्धा, हस्तकला, वस्त्रोद्योग व ॲग्रो प्रोडक्ट या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी उत्स्फूर्तपणे केलेले सहकार्य कौतुकास्पद ठरले. प्रत्येक स्पर्धेतील प्राविण्यप्राप्त विजेत्यांना पारितोषिक रोख रक्कम, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देवून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच विविध स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:39 PM 05/Dec/2024