रत्नागिरी : नाचणे श्रीरामनगर येथे घरफोडी करणाऱ्या संशयिताला डी. बी. स्कॉडने केली अटक

रत्नागिरी : रत्नागिरीतील नाचणे श्रीरामनगर येथील घरातून दागिन्यांसह रोख रक्कम चोरून नेणाऱ्या संशयिताला शहर पोलिसांनी अटक केली आहे. सॅमसन रुबेल डॅनियल (वय २६, रा. कल्याण) असे संशयिताचे नाव आहे. न्यायालयाने या संशयिताला मंगळवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. शहर पोलिस ठाण्याच्या डी. बी. स्कॉडने (डिटेक्शन ब्रँच) आरोपीला कल्याण येथील घरातून अटक केली.

नाचणे श्रीराम नगर येथे राहणाऱ्या परि किशोर सुर्यवंशी यांच्या घरातून २३ नोव्हेंबर रोजी दुपारी २ ते ४ या वेळेत सुमारे ८२ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरीस गेला, यामध्ये रोख रकमेसह सोन्याच्या दागिन्यांचाही समावेश होता. घरफोडीचा तपास करणाऱ्या डी. बी. स्कॉडमधील उपनिरीक्षक शाम आरमाळकर यांच्यासह हेड कॉन्स्टेबल राहुल जाधव, पडेलकर, भालेकर यांनी संशयिताला कल्याण येथील त्याच्या घरातून ताब्यात घेतले.

गुरुवारी संशयित समसन डॅनियलला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. संशयित गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याने त्याने इतर गुन्हे केले आहेत का? याची चौकशी करण्यासाठी पोलिस कोठडी देण्याची मागणी विशेष सहाय्यक सरकारी वकील निलांजन नाचणकर यांनी केली. न्यायालयाने त्याला ९ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:09 AM 06/Dec/2024