रत्नागिरीत आज उल्लास नवभारत साक्षरता मेळावा

रत्नागिरी : केंद्रशासन पुरस्कृत उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत आज (ता. ६) कोल्हापूर जिल्ह्यातील सायरस पूनावाला इंटरनॅशनल स्कूल पेठ वडगाव येथे कोल्हापूर विभाग व कोल्हापूर जिल्हास्तर अशा संयुक्त उल्लास मेळाव्याचे आयोजन केले आहे. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शिक्षण विभागाचे अधिकारी, नवसाक्षर, असाक्षर स्वयंसेवक या मेळाव्यात सहभागी होणार आहेत, अशी माहिती विभागीय शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांनी दिली.

कोल्हापूर येथे होणाऱ्या मेळाव्यामध्ये साक्षरतेसंबंधी विविध विषयांचे ६० स्टॉल मांडण्यात येणार आहेत. त्यात माझे कुटुंब, शेजार, नातेसंबंध, मतदान प्रक्रिया, ईव्हीएम या मशिन, दैनंदिन व्यवहार, वित्तीय साक्षरता, एटीएम, पासबुक, बाळाची निगा, वजन, उंची, लसीकरण, या आहार, पायाभूत व डिजिटल साक्षरता, वाहतुकीचे नियम, संवादमाध्यमे अशा विषयासंदर्भात माहिती दिली जाणार आहे. याच विषयांवर आधारित कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या पाचही जिल्ह्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जाणार आहेत. र या योजनेअंतर्गत आजपर्यंतच्या अंमलबजावणीची माहिती देणारे जिल्ह्यांचे तसेच विभागाअंतर्गत जिल्ह्यातील तालुक्यांचे आणि मनपा यांचे उल्लास विशेषांक पाहायला मिळणार आहेत तसेच नवसाक्षर व स्वयंसेवक यांचे मनोगत घेण्यात येणार असून, त्यांच्या चर्चासत्राचेही आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्याचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य योजना शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांच्या हस्ते होणार आहे. जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नियामक तर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत. उल्लास मेळाव्यात नवसाक्षर, स्वयंसेवक आणि उत्कृष्ट कार्य करणाऱ्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांचा प्रातिनिधीक सत्कार करण्यात येणार आहे.

असाक्षरांच्या नोंदणीचे उद्दिष्ट
२०२७ अखेर देशभरात ५ कोटी लोकांना साक्षर करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करायचे आहे. त्या दृष्टीने राज्य, विभाग, जिल्हा, तालुका व शाळास्तरावर असाक्षरांच्या नोंदणीचे उद्दिष्ट देण्यात आले असून, स्वयंसेवकांबरोबर त्यांची जोडणी करून त्यांना साक्षर करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:30 AM 06/Dec/2024