चिपळूण : ‘त्या’ वाळू उत्खननावर जिल्हा खनिकर्म विभागाची कारवाई

चिपळूण : येथील करबंवणे – बहिरवली खाडीत भर दिवसा सक्शन पंपाने सुरू असलेल्या वाळू उत्खननावर जिल्हा खनिकर्म विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली. या कारवाईत वाळू व्यावसायिकांचे २ पंप फोडले, तर १३ पंप पळवून नेण्यात संबंधित व्यावसायिक यशस्वी झाले. कालपासून चिपळूण तालुक्यातील खाडी भागातील गावात महसूल विभागाचे पथक तैनात करण्यात आले आहे.

वाशिष्टीसह करबंवणे बहिरवली खाडीत भर दिवसा सक्शन पंपाने अनधिकृतपणे वाळू उपसा होतो. त्याकडे स्थानिक महसूल विभागाचे दुर्लक्ष झाले. त्यामुळे रत्नागिरी येथील गौण खनिज विभागाच्या पथकाने चिपळूण येथून येऊन कारवाई केली. शासकीय यंत्रणा विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळी मध्ये व्यस्त असताना वाळू तस्करांचा चिपळूण परिसरातील खाडीमध्ये अतिरेक वाढला होता. चिपळूण परिसरातील खाड्यांमध्ये अधिकृत सेक्शन लावण्यासाठीसुद्धा परवानगी नाही.

खाडी भागात सेक्शन पंपाने वाळूचा अनधिकृत उपसा सुरू होता. त्याकडे स्थानिक महसूल विभागाने दुर्लक्ष केल्यानंतर येथे हातपाटीने चोरटी वाळू उपसा करणारे ही सेक्शन पंपाच्या व्यवसायात सामील झाले होते. गोवळकोट येथील धक्क्यावर वाळू आणली जात होती. तेथून ती जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात पाठवली जात होती. वाळू उत्खननांसह होणाऱ्या चोरट्या वाहतुकीच्या तक्रारी महसूल विभागाकडे फोन द्वारे झाल्या होत्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:34 AM 06/Dec/2024