◼️ जिल्हा बँक पाच हजार कोटींचा टप्पा ओलांडेल : डॉ. तानाजीराव चोरगे
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही सर्वसामान्यांची बैंक असून, त्यांच्या विश्वासावरच प्रगतीचे टप्पे गाठत आहे. २०२५ च्या आर्थिक वर्षात जिल्हा बँक पाच हजार कोटींचा टप्पा ओलांडेल आणि ८० कोटीहून अधिकचा नफा मिळवेल, असा विश्वास रत्नागिरी जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी व्यक्त केला.
रत्नागिरी जिल्हा सहकारी बँकेचा ६७ वा वर्धापन दिन रत्नागिरीतील प्रधान कार्यालयात झाला. यावेळी सभासद, ठेवीदार व सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक आणि कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. यानिमित्त श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बँकेचे अध्यक्ष डॉ. चोरगे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, सर्वसामान्य लोक, शेतकरी यांची प्रगती व्हावी, हा दृष्टिकोन ठेवून ६७ वर्षांपूर्वी या बँकेची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून आजपर्यंत प्रगतीच झाली आहे. ठेवी, कर्ज व्यवहार आणि सभासद या सर्वांची सातत्याने वाढ झाली आहे. सध्या जिल्हा मध्यवर्ती बैंक एका अशा उंचीवर पोहोचली आहे की, मार्च २०२५ पर्यंत पाच हजार कोटींच्या ठेवींचा टप्पा ओलांडेल आणि यावर्षी ८० कोटीपेक्षा अधिक नफा मिळवू, असा विश्वासही डॉ. चोरगे यांनी व्यक्त केला.
देशभरातील सहकार क्षेत्रातील कोणत्याही बँकेने दिला नाही, असा ३० टक्के डिव्हिडंट आपल्या सहकारी बँकेने दिला असल्याचे त्यांनी सांगितले. ही सर्वात मोठी गोष्ट आहे. यापुढेही दरवर्षी नफा आणि ठेवीत भरीव वाढ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संचालक मंडळ, अधिकारी हे एकमुखाने काम करीत आहेत. त्यामुळेच ठेवीदारांचा विश्वास वाढला आहे. सहकार क्षेत्रात भ्रष्टाचार मुक्त संस्था चालवली तर कोणतीही संस्था नियोजनबद्ध पुढे जात असते, असेही त्यांनी सांगितले. सर्व संचालक एकदिलाने काम करतील त्याचवेळी ही गोष्ट घडते. चार पाच राजकीय पक्षाचे संचालक असले तरी राजकारणाचे व पक्षाचे जोडे बाहेर काढून बँकेत येतात म्हणूनच ही प्रगतीची शिडी गाठता आली असल्याचा भावना शेवटी त्यांनी व्यक्त केल्या.
जिल्हा बँक ही सामान्य लोकांची बँक
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही सामान्य लोकांची बँक आहे. त्यांचा विश्वास या बँकेवर आहे. गावागावांत, घराघरांत, शेतकऱ्यांपर्यंत बैंक पोहोचली आहे. अन्य कोणतीही आर्थिक संस्था अशी पोहोचलेली नाही. ग्राहक, कर्जदार, ठेवीदारांच्या कोणत्याही गोष्टीला ठेच पोहोचणार नाही याची दक्षता बँकेने घेतलेली असल्यानेच आतापर्यंतचा प्रगतीचा मोठा टप्पा पार करता आल्याचेही डॉ. तानाजीराव चोरगे यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:53 06-12-2024