राजापूर : जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून मंगळवार ३ रोजी पंचायत समिती राजापूर येथे तालुक्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या हस्तकलेतून साकारलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनातून जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. तालुक्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांनी शाळेत हस्तकलेतून तयार केलेल्या निवडक वस्तूंचे गटसाधन केंद्र समावेशित शिक्षण विभागामध्ये प्रदर्शन मांडण्यात आले होते. प्रदर्शनाचे उद्घाटन तालुक्याचे गटविकास अधिकारी नीलेश जगताप यांच्याहस्ते फित कापून करण्यात आले. त्यानंतर दिव्यांग क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या हेलन केलर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. गटशिक्षणाधिकारी उत्तम भोसले यांनी मान्यवरांचे स्वागत केले. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य साधनांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
दिव्यांग कक्षात भरविण्यात आलेल्या या प्रदर्शनामध्ये अनेक टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ व उपयुक्त साहित्य तयार करण्यात आले होते.
तसेच विशेष शिक्षकांमार्फत शैक्षणिक साहित्य निर्मिती करण्यात आली होती. गटशिक्षणाधिकारी उत्तम भोसले यांनी आपल्या प्रास्ताविकेतून या वर्षीची दिव्यांग दिनाची थीम ही समावेशक आणि शाश्वत भविष्यासाठी अपंग व्यक्तींच्या नेतृत्वाला प्रोत्साहन देणे ही आहे. या थीमचा उद्देश दिव्यांग व्यक्तींना नेतृत्वाच्या केंद्रस्थानी आणणे आणि त्यांचे अनुभव आणि योगदान ओळखणे हा आहे.
गटविकास अधिकारी निलेश जगताप यांनी शुभेच्छा देताना दिव्यांग दिन साजरा करण्यामागील इतिहास कथन करत संयुक्त राष्ट्रसंघाने १९८१ हे आंतरराष्ट्रीय अपंग व्यक्तींचे वर्ष म्हणून घोषित केले. त्यानंतर अपंग व्यक्तींसाठी संयुक्त राष्ट्र संघाने १९८३-१९९२ हे दिव्यांग दशक म्हणून घोषित करण्यात आले. या प्रयत्नांद्वारे दिव्यांग व्यक्तींचे हक्क आणि सहभाग यावर भर दिला गेला. १९९२ मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने दरवर्षी ३ डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग दिन हा साजरा करण्याची अधिकृत घोषणा केले.
दिव्यांग तालुका समन्वयक ज्ञानेश्वर गुरव यांनी आपल्या मनोगतातून या दिवसाचा उद्देश आणि महत्त्व समजावून देताना अपंग व्यक्तींवरील भेदभाव दूर करणे, त्यांचे सर्वसमावेशक शिक्षण आणि रोजगारामध्ये सहभाग सुनिश्चित करणे आणि समाजातील त्यांच्या सक्रिय भूमिकेला प्रोत्साहन देणे हा या दिवसाचा उद्देश असल्याचे सांगितले.
विशेष शिक्षक मुकेश मधाळे यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सेवा-सुविधा व दिव्यांग बालकांचे अधिकार याविषयी माहिती दिली. तसेच विषेश शिक्षक नितेश देवळेकर यांनी दिव्यांग प्रकार समजावून दिले. त्यानंतर विशेष शिक्षक रुबिना नावळेकर यांनी विद्यार्थी व पालकांना श्रवणयंत्र वापर करण्याबाबत प्रात्यक्षिकासह माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर गुरव यांनी केले व आभार नितेश देवळेकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष तज्ज्ञ ज्ञानेश्वर गुरव, विशेष शिक्षक मुकेश मधाळे, रुबिना नावळेकर, नितेश देवळेकर यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमासाठी तालुक्यातील दिव्यांग संघटना प्रतिनिधी संतोष सावंत व विजय मोहिते, शिक्षक, दिव्यांग, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:14 AM 06/Dec/2024