दापोली : दापोलीत येणारे पर्यटक हे शेतकऱ्यांनी पिकविलेल्या पालेभाज्या आणि कंदमुळांना पसंती दर्शवित आहेत. त्यामुळे येथील शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा होत आहे.
जमिनीखाली वाढणाऱ्या वनस्पतींना कंदमुळं असं म्हणतात. उपवासाच्या दिवशी किंवा सॅलेडमधून कंदमूळं खाण्याची पद्धत आहे. जमिनीखाली दडलेल्या या कंदमुळांमध्ये भरपूर प्रमाणात पोषकतत्त्व असतात. ज्यामुळे त्वरित ऊर्जा मिळू शकते. तालुक्यातील शेतकरी हिवाळ्याच्या हंगामात वेगवेगळ्या पालेभाज्या आणि कंदमुळे विक्रीसाठी दापोली शहरात आणि पर्यटनस्थळी बसतात. आपटी, बांधतीवरे या गावांमध्ये नदीकिनारी वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या पिकवल्या जातात.
शेतकऱ्यांच्या या शेतीमालाला पर्यटक पसंती दर्शवत आहेत. यातून येथील शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होत असून, यामुळे गावांमध्ये रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध होत आहेत. कोकणातील ग्रामीण भागात कंदमुळांची शेती केली जाते. काही कंदमुळे नैसर्गिकपणे जंगल परिसरात मिळतात. त्यांचा शोध घेऊन ती विक्रीसाठी शहरात घेऊन येतो. यातून त्याला चांगले आर्थिक उत्पन्न मिळते. सुरण, गवती चहा, अळुवडीची पाने, घोरकेन, आंबट बोरे, काजू गर, आंबेडा, गोडकोकम आदींना पर्यटकांकडून मोठी मागणी आहे.
शेतकरी वेगवेगळ्या प्रकारच्या दापोलीच्या मातीत नैसर्गिक पद्धतीने पिकविलेल्या पालेभाज्या आणि कंदमुळे पर्यटकांना आवडतात. त्यामुळे दापोलीत येणाऱ्या पर्यटकांचा स्थानिक शेतकऱ्यांना फायदा होत आहे. – नरेंद्र कुटरेकर नारगोली, दापोली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:42 AM 06/Dec/2024