रत्नागिरी : मराठी भाषेला प्राप्त झालेला अभिजात दर्जा टिकवून ठेवण्यासाठी एक नागरिक म्हणून प्रत्येक मराठी माणसाठी जबाबदारी आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय साहित्य परिषदेचे कोकण प्रांताध्यक्ष प्रवीण देशमुख यांनी केले.
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या मराठी विभागातर्फे ‘अभिजात मराठी भाषा : नागरिकांची जबाबदारी’ या विषयावर श्री. देशमुख यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीत कार्यक्रम झाला. कार्यक्रमासाठी व्यासपीठावर महाविद्यालयाच्या कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी, भारतीय इतिहास संकलन समिती कोकण प्रांताचे सचिव चंद्रकांत जोशी उपस्थित होते.
व्याख्यानात प्रवीण देशमुख यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कसा प्राप्त झाला या संदर्भातील विविध टप्पे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. तसेच विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली. सर्वच भाषा उत्तम आहेत. मात्र आपली मातृभाषा प्रत्येकाला अधिक जवळची असते. त्यामुळे तिचा वापर आणि तिची जोपासना प्रत्येकाने केली पाहिजे. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे प्रकाशन आणि अनुवादासह रोजगाराच्याही अनेक संधी उपलब्ध होणार आहेत, असे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय मनोगतात कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी म्हणाल्या, व्यवहार जीवनात आपण जास्तीत जास्त मराठी शब्द उपयोगात आणले पाहिजेत. मराठीच्या प्रचार व प्रसार कार्यात सहभागी झाले पाहिजे. तरच मराठी भाषा प्रवाही राहील, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.
व्याख्यानप्रसंगी मराठी विभागप्रमुख डॉ. शिवराज गोपाळे, डॉ. निधी पटवर्धन, संस्कृत विभागप्रमुख डॉ. कल्पना आठल्ये, राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. नीलेश पाटील, प्रा. प्रज्ञा भट, भारतीय इतिहास संकलन समिती कोकण प्रांताचे सहसचि प्रशांत रावदेव, प्रमोद कोनकर तसेच कला शाखेचे विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:53 06-12-2024