रत्नागिरी : राज्य नाट्य स्पर्धेत ७० हजारांची तिकीट विक्री

रत्नागिरी : रत्नागिरीत पार पडलेल्या ६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत ७० हजाराहून अधिक रुपयांची तिकीट विक्री झाली.

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे ६३ वी राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

रत्नागिरी केंद्रावर स्पर्धेची रत्नागिरी जिल्ह्याची प्राथमिक फेरी २६ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर या कालावधीत पार पडली. रत्नागिरीच्या स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात विविध संस्थांनी आठ नाटके सादर केली. नाटकाच्या तिकीट विक्रीतून येणाऱ्या रकमेपैकी निम्मी रक्कम नाटक सादर करणाऱ्या संस्थेला दिली जाते. नाटकाला प्रेक्षकवर्ग लाभावा यासाठी केवळ दहा आणि पंधरा अशा अत्यल्प दरातील तिकिटांची विक्री केली जाते. रत्नागिरी केंद्रावर सादर झालेल्या चार नाटकांना प्रेक्षकांची भरपूर गर्दी झाली. त्यापैकी पाली येथील श्री लक्ष्मीपल्लीनाथ आणि इतर देवस्थान संस्थेने सादर केलेल्या अखेरचा सवाल या नाटकाला तर हाउसफुल्लचा फलक लावावा लागला, एवढी तिकीट विक्री झाली. प्रायोगिक थिएटर्स असोसिएशनचे महानायक, कोतवडे पंचक्रोशी माजी विद्यार्थी संघाच्या कढीपत्ता नाटकाला, तसेच खल्वायन संस्थेच्या स्वप्नपक्षी या नाटकालाही प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला.

संपूर्ण नाट्य स्पर्धेत एकंदर ४ हजार ९२५ तिकीटधारक प्रेक्षकांनी नाटकांचा आस्वाद घेतला. त्यांनी खरेदी केलेल्या तिकिटांमधून ७० हजार १२५ रुपयांची विक्री झाली. त्यातील निम्मी रक्कम संबंधित संस्थांना देण्यात आली. राज्य नाट्य स्पर्धेतील नाटकांना अलीकडे प्रेक्षकवर्ग मिळू लागला आहे, हे यावेळच्या स्पर्धेने स्पष्ट झाले. मात्र स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संस्थांची संख्या घटली आहे. नेहमी भाग घेणाऱ्या संस्थांचा सहभागही कमी झाला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:57 06-12-2024