रत्नागिरी : राज्य विधानसभेत सत्ताधारी महायुतीसाठी गेमचेंजर ठरलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची पडताळणी करण्याचे काम प्रशासनाने सुरु केल्याने जिल्ह्यातील लाडक्या बहिणीना धडकी भरली आहे. मात्र, आचारसंहितेपूर्वी जे अर्ज दाखल झालेले आहेत, त्या अर्जाचीच ऑनलाईन पडताळणी केली जाणार असल्याने ज्या बहिणींना यापूर्वीच योजनेचा लाभ मिळाला आहे, त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेने सत्ताधाऱ्यांना चांगले घवघवीत यश संपादित करुन दिले आहे. लोकसभेत ज्या महायुतीला मोठ्या अपयशाला सामोरे जावे लागले होते, त्याच महायुतीला या लाडक्या बहिणींनी विधानसभेत अभूतपूर्व यश मिळवून देत पुन्हा सत्ता मिळवून दिली. यामुळे लाडकी बहीण योजना सत्ताधाऱ्यांसाठी गेमचेंजरच ठरली आहे. निवडणुका संपताच मात्र ही योजना आता
बंद होणार अथवा अर्जाची छाननी केली जाणार अशा बातम्या सोशल मीडियावरुन जोरात व्हायरल होऊ लागलेल्या आहेत, यामुळे लाडक्या बहिणींमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. मात्र अद्याप सरकारच सत्तारुढ झालेले नसल्याने सध्यातरी ही योजना बंद होण्याची तुर्तास तरी शक्यता नाही.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या दुसऱ्या टप्प्यातही जिल्ह्यात महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. जिल्ह्यात ४ लाख १८ हजार ८२४ अर्ज मंजूर झाले होते. त्यांच्या खात्यात २ महिन्यांचे पैसे जमा झाले.
महाराष्ट्र शासनाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू केली आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेचा उद्देश महिलांना आर्थिक स्वावलंबन देणे, त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुध भरणा करणे आणि त्यांच्या कुटुंबातील निर्णय प्रक्रियेत त्यांची भूमिका मजबूत करणे हा आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजने अंतर्गत पात्र महिलांना जुलै महिन्यापासून दरमाह १५०० रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. असे चार महिन्यांचे हप्ते हजारो महिलांना मिळालेले आहेत.
हे पैसे महिलांना त्यांच्या वैयक्तिक आणि घरगुती खर्च चालविण्यासाठी तसेच त्यांच्या आरोग्य आणि पोषणासाठी आणि कुटुंबाच्या निर्णयांमध्ये अधिक सक्रियतेने योगदान देण्यासाठी आर्थिक मदत म्हणून उपयुक्त ठरत आहेत.
आर्थिक सहाय्यावर लक्ष केंद्रित करून, सरकार महिलांच्या मूलभूत समस्यांचे निराकरण करण्याचा हा प्रयत्न आहे. राज्य सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची घोषणा केल्यानंतर एकही पात्र महिला लाभापासून वंचित राहू नये, यासाठी रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने योग्य नियोजन केले आहे.
विधानसभा निवडणुकीमुळे ही योजना आचारसंहितेमुळे तात्पुरती स्थगित करण्यात आली. मात्र, आता नवीन सरकार स्थापन होताच ही योजना पुन्हा जोमाने राबविली जाण्याची शक्यताही वर्तविली आहे. निवडणुकीतही महायुतीतर्फे लाडकी बहीण योजना बंद न होता त्यात वाढ केली जाणार असल्याचे आश्वासन माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस, अजित पवार आदीनी प्रचारामधून दिलेली आहे.
शिवाय तिन्ही जाहीरनाम्यामधूनही तसे आश्वासनही देण्यात आल्याने त्याचा फायदा तिन्ही पक्षांना होऊन पुन्हा सत्तेवर येण्यात लाडकी बहीण योजनेचा मोठा वाटा आहे.
महिन्याला येतात ६१ कोटी ५४ लाख २३ हजार
जिल्ह्यात या योजनेला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला. जवळपास साडेचार लाख अर्ज दाखल झाले आहेत. त्यापैकी ४ लाख १८ हजार ८२४ अर्ज मंजूर झाले आहेत. यामुळे दर महिन्याला ६१ कोटी ५४ लाख २३ हजार रुपये या योजनेपोटी जिल्ह्यात जमा होतात.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:12 PM 06/Dec/2024