लांजा : आसगे मांडवकरवाडीत बिबट्याचा धुमाकूळ

लांजा : लांजा तालुक्यातील आसगे मांडवकरवाडी येथे गेली सहा महिने बिबट्याने धुमाकूळ घातला असून अनेक पाळीव जनावरे फस्त केली. काही महिन्यांपूर्वी एका व्यक्तीवर हल्ला केला होता. त्यामुळे आसगे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

तालुक्यातील आसगे गावतील मांडवकरवाडी येथे सहा महिन्यांपासून बिबट्याचा वावर सुरू असून, वाडीमधील शेतकऱ्यांच्या गुरांवर बिबट्या हल्ला करत आहे. आसगे मांडवकरवाडी येथील प्रकाश मांडवकर यांच्यावर काही महिन्यांपूर्वी बिबट्याने हल्ला केला होता, ते बिबट्याच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावले. कमलाकर नारायण मांडवकर यांची एक गाय ठार, शंकर रावजी मांडवकर यांची दोन वासरे ठार, बाळू रामचंद्र मांडवकर यांचे एक वासरू, कृष्ण हरी मांडवकर यांचे एक वासरू असे पाळीव प्राणी ठार केल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. गावातील उनाड कुत्री व मांजरे यांना बिबट्याने आपले भक्ष्य केले.

रात्रीच्यावेळी बाहेर पडण्याची भीती गाय, बैल, वासरे यांवर अनेक वेळा बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. उनाड कुत्र्यांना व मांजरांना भक्ष्य केले आहे. रात्री-अपरात्री बिबट्या लोकवस्तीमध्ये येऊन पाळीव जनावरांवर हल्ला करत आहे. त्यामुळे रात्रीच्यावेळी घराबाहेर पडण्यास नागरिक धजावत नाहीत.

बिबट्याचा वाढत्या मुक्त संचारामुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी येथील विश्वास मांडवकर यांनी वनविभाग लांजा यांच्याकडे केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:46 PM 06/Dec/2024