संगमेश्वर : माखजन खाडीपट्ट्यात माकडांचा उच्छाद

आरवली : माखजन खाडीपट्ट्यात माकडांनी मोठा उच्छाद मांडला आहे. या माकडांच्या वाढलेल्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. आंबा, काजू बागांसह फळपिकांचे नुकसान करणाऱ्या माकडांना पकडण्याची मोहीम आंबा हंगाम सुरू होण्याआधी करण्यात येणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी केलेल्या कडधान्य शेतीचे माकड आणि गवे नुकसान करीत असल्याने शेतकरी वर्ग हैराण झाला आहे.

माखजन, धामापूर, करजुवे, नारडुवे, असावे, कासे परिसरातील बागायतदार व शेतकरी माकडांच्या आणि गव्यांच्या त्रासाला कंटाळले आहेत. नारळाच्या झाडाला कोंब फुटून छोटे नारळ बाहेर येताच माकडे खातात.

त्यामुळे नारळ मोठा होत नसल्याने नुकसान होत आहे. थंडीत आंब्याला मोहर येणार आहे. त्यानंतर आंबा कैरी रूपात असताना माकडाचे कळप आले तर आंब्याचे पीक नष्ट होईल. त्यासाठी वन खात्याने आताच उपाययोजना करावी, अशी मागणी बागायतदार करत आहेत.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आंबा आणि काजू याबरोबर इतर फळांचे उत्पन्न घेतले जाते. याबरोबर भाजीपाला व भात शेती कोकणात केली जाते; मात्र गेली काही वर्षे फळबागा आणि शेतीपिकांचे माकडांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे कोकणातील शेतकरी आणि बागायतदार हवालदिल झाला आहे. दरवर्षी त्याला मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे; परंतु हा प्रश्न सोडवण्यासाठी शेतक-यांनी वन खात्यात अनेक वेळा तक्रार करूनही वन खात्याकडून कारवाई होताना दिसत नाही. बागायतदारांनी माकड, वानरांपासून होणाऱ्या उपद्रवाबद्दल आवाज उठवण्याची गरज आहे. परिसरात रोज सकाळी सात वाजता घरच्या छपरावर वीस पंचवीस माकडे असतात. यामुळे कौले, सिमेंटचे पत्रे यांचेही नुकसान होत आहे.

एक झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारत कर्कश आवाज करत व घराची खिडकी उघडी असली तर घरातील खाण्याच्या वस्तू उचलून खातात. यामुळे घरातील महिला लहान मुले भयभीत झाले आहेत. नागरिकांना दरवाजे बंद करून घरी बसावे लागत आहे. आंबा, काजू, नारळ आणि सुपारीच्या बागा मोठ्या प्रमाणात आहेत; परंतु गेली वर्षभर माकडांची झुंड मानव वस्तीत येऊन अतिशय नासधूस करत आहे. नारळ, सुपारी, आंबा, काजू पीक हाताशी येताच माकडे खाऊन टाकतात.

जंगलात फळझाडे लावणे गरजेचे
मुख्य म्हणजे जंगलात फळ देणारी झाड नसल्यामुळे माकडे शहराकडे वळतात. वन खात्याने सर्वच जंगलात फळ देणारी झाडाची लागवड करण्याची गरज आहे. उंबर, पेरू, आवळा, काजू अशी झाडे लावण्यासाठी शासनाने अनुदान देण्याची गरज आहे. त्यासाठी जनतेचे सहकार्य घ्या. बागायतदारांचे झालेल्या नुकसानभरपाईचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदतीचा हात पुढे करा, अशी मागणी करण्यात येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:54 PM 06/Dec/2024