लांजा : वेरळ येथील श्री देव लक्ष्मीकांत मंदिरात आयोजित कार्तिक उत्सव उत्साहात साजरा झाला. या प्रसंगी हिंदुस्थानी शास्त्रीय गायक आणि ग्वाल्हेर घराण्याचे दिग्गज, वेरळचे सुपुत्र गायनाचार्य (कै.) पंडित राजारामबुवा पराडकर यांना संगीतमय सुमनांजली कार्यक्रम आणि पुस्तक प्रकाशन कार्यक्रम उत्साहात साजरा झाला.
या वर्षीच्या उत्सवाची आयोजनाची जबाबदारी पराडकर कुटुंबीयांनी घेतली होती. सूरमणी श्रीपाद पराडकर लिखित संगीताचा वारसा या पुस्तकाचे प्रकाशन देवस्थानचे अध्यक्ष रघुनाथराव गुण्ये यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांच्यासोबत नथूकाका पाध्ये उपस्थित होते. या दोन्ही मान्यवरांचा (कै.) पं. गायनाचार्य राजारामबुवा पराडकर यांच्या १२५ व्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. ललित पराडकर व दीपा पराडकर साठे यांचा भक्तीसंगीत व शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम रंगला, बहीण-भाऊ असा कार्यक्रम सादर करण्याचा हा विचार समस्त प्रेक्षक, रसिकांना खूपच आनंददायक झाला. प्रथम सौ. साठे यांनी जोग रागातील रूपकमधील बंदिश सादर केली. नंतर ललित पराडकर यांनी भक्तीसंगीत रूप सावळे सुंदर, आधी रचिली पंढरी, आम्हा न कळे ज्ञान ही गीते सुरेल आवाजात सादर केली. ललित पराडकर हे गुरू. पं. विभव नागेशकर यांचे गंडबंध शागीर्द आहेत. त्यांना लहानपणापासून गझल, हिंदी गाण्यांचा सतत ध्यास होता. प्रसन्न व्यक्तीमत्व व सुरेल आवाज सुरेलपणा यामुळे रसिकांची मने जिंकली.
दीपा साठे यांनी वाजे मृदंग टाळवीणा, विष्णुमय जग, स्मरा हो दत्तगुरू दिनरात, अशी भक्तीगीते, माणिक वर्माचे सुगम संगीत सादर केले. अतिशय सुंदर हरकती, सुरेल, भावनांचा गीतातील आवाजाची जाणीवपूर्वक फेक ही गाण्याची वैशिष्ट्ये जाणवली. मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शन, या भैरवीने कार्यक्रमाची सांगता झाली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:16 PM 06/Dec/2024