सावर्डे : संगमेश्वर तालुक्याच्या उत्तरेकडील कडवई, कुचांबे, माखजन, कोकरे परिसरात वानरांच्या त्रासाने शेतकरी हैराण झाले आहेत. वानरांच्या उपद्रवामुळे आंबा, काजू, भाजीपाला व फळझांडाचे मोठे नुकसान होत आहे. ही पिके वाढवण्यासाठी आर्थिक, शारीरिक कष्ट करून ही पिके हाताला लागत नसल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे.
राज्यशासनाच्या फलोद्यान योजनेमुळे बहुसंख्य शेतकऱ्यांनी पडिक जमिनीत आंबा, काजू, मसाला पिके, चिकू, पेरू, सुपारी, कडधान्ये आदी आर्थिक उत्पन्न देणाऱ्या पिकांची लागवड केली आहे. या पिकांच्या उत्पनातून चार पैसे गाठीला लागतील, ही शेतकऱ्यांची भावना आहे; मात्र वानरांचे कळप या जमिनीत आंबा, काजूपिकांचे मोहोर खात आहे. तयार झालेल्या चिकू, पेरू फळांचा फडशा पाडत आहेत. कितीही हाकलले, तरी ही वानरे पुन्हा-पुन्हा येत असल्याने शेतकऱ्यांना इतर कामे सोडून वानरांना हुसकावण्यात वेळ घालवावा लागत आहे. वाढलेल्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. आंबा, काजू बागांसह फळ पिकांचे नुकसान करणाऱ्या वानरांना पकडण्याची मोहीम आंबा हंगाम सुरू होण्याआधी करण्यात येणे गरजेचे आहे. माखजन, धामापूर, करजुवे, नारडूवे असावे, कासे परिसरातील बागायतदार व शेतकरी वानरांच्या आणि रानगव्यांच्या त्रासाला कंटाळले आहेत. नारळाच्या झाडाला कोंब फुटून छोटे नारळ बाहेर येताच वानरे खातात. त्यामुळे नारळ मोठा होत नसल्याने नुकसात होत आहे. थंडीत आंब्याला मोहोर येणार आहे. त्यानंतर आता कैरी रूपात असताना वानरांचे कळप आले, तर आंब्याचे पीक नष्ट होईल.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आंबा आणि काजू याबरोबर इतर फळांचे उत्पन्न घेतले जाते. याबरोबर भाजीपाला व भातशेती कोकणात केली जाते; मात्र गेली काही वर्षे फळबागा आणि शेती पिकांचे वानरांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे कोकणातील शेतकरी आणि बागायतदार हवालदिल झाला आहे. दरवर्षी त्याला मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे; परंतु हा प्रश्न सोडवण्यासाठी वनखात्यात अनेकवेळा तक्रार करूनही कारवाई होताना दिसत नाही.
जंगलात फळ झाड नसल्यामुळे माकडे शहराकडे वळतात. वनखात्याने जगलात फळ देणारी झाड्याची लागवड करण्याची गरज आहे.उंबर, पेरू, आवळा, काजू अशी झाडे लावण्यासाठी शासनाने अनुदान देण्याची गरज आहे. बागायतदारांचे झालेल्या नुकसानभरपाईचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदतीचा हात पुढे करण्याची गरज आहे. जाकीर शेकासन, माजी पंचायत समिती सदस्य, कोंडिवरे
कोकणात भात पिकाव्यतिरिक्त दुसरे उत्पन्न देणारे पीक नाही. त्यामुळे कोकणी माणूस बागायती व फळझाडे पिकांकडे वळला आहे: मात्र जंगली प्राण्यांकडून या पिकांचे नुकसान होत असल्याने हताश होण्यापलीकडे दुसरा पर्याय नाही. शासनाने त्यातून मार्ग काढण्याची गरज आहे. अमित देसाई, शेतकरी, कुंभारखाणी बुदुक
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:54 PM 06/Dec/2024