संस्कृत अनुवादात महाराष्ट्राचा खारीचा वाटा

रत्नागिरी : भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त दिल्ली येथे कार्यक्रमात राज्यघटनेच्या संस्कृत अनुवादाचे प्रकाशन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आले. या अनुवादाच्या संपूर्ण प्रक्रियेत महाराष्ट्राचा खारीचा वाटा होता. कारण, पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे श्रीनंद बापट आणि डेक्कन कॉलेजचे भव शर्मा या दोन पुणेकरांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. राज्यघटनेचा संस्कृत अनुवाद तिसऱ्यांदा करण्यात आला आहे.

राज्यघटनेच्या या संस्कृत अनुवादाच्या प्रकल्पाचे नेतृत्व म्हैसूर येथील केंद्रीय भाषा संस्थेच्या (सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन लँग्वेजेस) राष्ट्रीय अनुवाद अभियानने स्वीकारले होते. त्यामध्ये आकाशवाणी आणि दूरदर्शनचे माजी संस्कृत कार्यक्रमप्रमुख डॉ. बलदेवानंद सागर, पुण्यातील डेक्कन कॉलेजचे डॉ. भव शर्मा आणि भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे श्रीनंद बापट यांच्यासह दहाजणांनी योगदान दिले. म्हैसूर येथे गेल्या वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांमध्ये हे काम करण्यात आले होते. त्यानंतर पुण्यात आल्यावर पुढच्या काही महिन्यांमध्ये सर्व मजकुराची तपासणी करून फेब्रुवारी अखेरीस हे काम पूर्णत्वास गेले. १९५०च्या दशकातच राज्यघटनेच्या संस्कृत अनुवादाची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली होती. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेतील विद्वान महामहोपाध्याय पां. वा. काणे हे त्या समितीचे अध्यक्ष होते. संस्कृत अनुवादाची दुसरी आवृत्ती १९८५ मध्ये प्रकाशित झाली. त्या आवृत्तीच्या कामाचे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे प्रमुख होते. गेल्या ३९ वर्षात घटनेत झालेल्या दुरुस्त्यांसह नवीन आवृत्ती संस्कृतमध्ये पुन्हा प्रकाशित झाली.

संविधानाची जी पहिली संस्कृत आवृत्ती प्रकाशित झाली तेव्हा त्या समितीचे अध्यक्ष महामहोपाध्याय भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे होते. रत्नागिरीतील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्राला भारतरत्न डॉ पांडुरंग वामन काणे यांचे नाव देण्यात आले आहे. त्यामुळे एका अथनि ही अभिमानास्पद बाब आहे. आधुनिक जगातही भारतात अशारितीने संस्कृती जपणूक आणि संवर्धन विकास होत आहे. प्रो. हरेराम त्रिपाठी, कुलगुरू, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक नागपूर

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:41 PM 06/Dec/2024