रत्नागिरी : माजी आमदार असोत की अन्य कोणी सर्वसामान्य कार्यकर्ता यांचे पक्षवाढीसाठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात स्वागतच केले जाईल. मातोश्रीकडून जे आदेश येतील त्यानुसार विधानसभेला जो कोणी उमेदवार असेल त्याचे काम प्रामाणिकपणे केले जाईल असे स्पष्ट मत शिवसेना उबाठाचे सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक यांनी सांगितले.
गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी रत्नागिरी दक्षिणचे जिल्हाप्रमुख विलास चाळके, रत्नागिरी तालुकाप्रमुख बंड्या साळवी, युवकचे तालुकाधिकारी प्रसाद सावंत आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, विधानसभेच्या चाचपणीसाठी नुकतेच निरीक्षक येऊन गेले. त्यांनी प्रत्येक प्रमुख पदाधिकारी, विभाग प्रमुख, युवक, महिला पदाधिकारी यांच्याशी वैयक्तीक चर्चा केली असून, संभाव्य उमेदवारांबाबतची मते जाणून घेतली आहेत. त्यांनी याबाबतचा अहवाल पक्षप्रमुखांकडे दिला आहे. त्यामुळे उमेदवारीबाबतचा निर्णय पक्षप्रमुख घेतील. पक्षप्रमुख जो कोणी उमेदवार देतील त्याचे काम प्रामाणिकपणे केले जाईल असे महाडीक यांनी स्पष्ट केले. उमेदवार मग तो बाहेरुन आलेला असो की पक्षामधील सर्वांकडूनच पक्षाच्या आदेशाचे पालन होईल असेही त्यांनी सांगितले.
गणेशोत्सवापूर्वीपासून सर्वच विधानसभा मतदार संघात शिवसेना उबाठातर्फे भगवा सप्ताह सुरु असून ग्रामीण व शहरी भागात उत्स्फुर्त पाठिंबा मिळत आहे. घराघरात मशाल पोहचवण्याचे काम व सभासद नोंदणीला मोठा पाठिंबा मिळाला आहे. लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही रत्नागिरी, लांजा-राजापूर व चिपळूण-संगमेश्वरमध्ये शिवसेना महाविकास आघाडीचे वर्चस्व राहिल असेही त्यांनी सांगितले. लोकसभेमध्ये ज्या बुथवर व भागात मशालला कमी मते मिळाली, त्याठिकाणी विशेष प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी विभागवार बैठका घेतल्या जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:37 27-09-2024