रत्नागिरी : राज्यात सर्वात जास्त पाऊस पडणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्याच्या भूजल पातळीने यंदा दिलासा दिला आहे. वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने केलेल्या सर्वेमध्ये गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत या वेळी जिल्ह्याची भूजल पातळी ०.०७ मीटर वाढली आहे. जिल्ह्याचा हा सर्वे असला तरी चार तालुक्यांमध्ये मात्र भूजलपातळी खालावलेली आहे. तसा अहवाल या विभागाने जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेला दिला आहे.
वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडून दर तीन महिन्याला हा सर्व्हे होतो. त्यासाठी जिल्ह्यातील ६३ विहिरी निश्चित केल्या आहेत. त्यांची पाणीपातळी मोजून त्यावर हा अंदाज बांधला जातो. जिल्ह्यातील दरवर्षी सरासरी साडेतीन हजार मिमी पावसाची नोंद होते. त्यामुळे जिल्ह्याची पाणीपातळी वाढणार, अशी सर्वांची धारणा असते; परंतु अतिवृष्टीचा तसा भूजलपातळीवर थेट परिणाम होत नाही. त्यासाठी रेनहार्वेस्टिंग किंवा पाणी अडवा-पाणी जिरवा हे अभियान राबवणे आवश्यक आहे. तरच भूजल पातळीत वाढ होते. गेल्या पाच वर्षांतील सप्टेंबरमधील सरासरी पाणीपातळी ३.०१ मीटर होती. यामध्ये सर्वांत कमी मंडणड तालुक्याची ०.९७ मीटर पाणीपातळी होती तर सर्वांत जास्त लांजा तालुक्याची ५.६२ मी. एवढी पाणीपातळी होती. त्यानंतर उर्वरित तालुक्याची या दरम्यान पाणीपातळी होती; परंतु सप्टेंबर २०२४ मध्ये झालेल्या सर्वेमध्ये २.९४ मी. एवढी आहे. गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत ही पातळी ०.०७ मीटर एवढी भूजल पातळीत वाढ झाली आहे. जिल्ह्यातील मंडणगड ०.०५ मी., दापोली ०.०७ मी., गुहागर ०.६७ मी., चिपळूण ०.१० मी. या चार तालुक्यांमध्ये भूजल पातळी घटली आहे. उर्वरित खेड तालुक्यात ०.११ मी., संगमेश्वर ०.२७ मी., रत्नागिरी ०.४७ मी., लांजा ०.३९ मी., राजापूर ०.३३ मीटरने भूजलपातळी वाढली आहे.
विंधन विहिरींचा मोठा परिणाम
गेल्या काही वर्षांमध्ये बोअरवेल मारण्याचे प्रमाण अधिक आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बोअरवेल मारल्या गेल्या आहेत. शासनाच्या निकषानुसार २०० फुटापेक्षा जास्त खोलवर बोअरवेल मारता येत नाही; परंतु खासगी ठिकाणी मारल्या जाणाऱ्या बोअरवेलवेळी या निकषाची पायमल्ली केली जाते. त्याचा परिणामही भूजल पातळीवर होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:41 06-12-2024