रत्नागिरी : मिरकरवाडा समुद्रात विना परवाना घुसलेल्या कर्नाटकच्या नौकेसह हर्णे, दाभोळ समुद्रात एलईडी दिव्यांचा वापर करून मासेमारी करणाऱ्या नौका मालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त तथा अधिनिर्णय अधिकारी आनंद पालव यांनी कर्नाटकच्या नौकेला ३ लाख ४१ हजार तर एलईडी मासेमारी करणाऱ्या नौकांना प्रत्येकी ५ लाख रुपयांचा दंड
भरण्याचा निर्णय दिला.
रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदरात कर्नाटकची अलबहार मासेमारी नौका घुसत असताना मत्स्य व्यवसाय विभागाच्या पथकाने पकडली. गेल्या दहा दिवसांपासून ही नौका मिरकरवाडाबंदरात रोखून ठेवण्यात आली होती. या संदर्भात अधिनिर्णय अधिकारी आनंद पालव यांच्यासमोर सुनावणी झाली. बंदर बदलण्याबाबतचे कोणतीही परवानगी नसताना घुसखोरी करणाऱ्या या नौका मालकाला ३ लाख ४१ हजार रुपये दंड करण्यात आला.
दापोली तालुक्यातील दाभोळ-हर्णे समुद्रात २० वाव अंतरावर एलईडी मासेमारी करणाऱ्या दोन नौका मत्स्य व्यवसायच्या गस्ती नौकेने पकडल्या होत्या. यातील एका नौकेचे नाव राजश्री तर दुसऱ्या नौकेचे नाव भाविका असे आहे. आठवड्यापूर्वी या दोन्ही नौका जयगड बंदरात रोखून ठेवण्यात आल्या होत्या. या प्रकरणी अधिनिर्णय अधिकारी पालव यांच्यासमोर सुनावणी झाली. या दोन्ही नौका मालकांना प्रत्येकी ५ लाख रुपये दंड भरण्याचा निर्णय देण्यात आला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:29 AM 07/Dec/2024