गुहागर : डोंबिवलीमधून पर्यटनासाठी गुहागरला जाणाऱ्या टेम्पोला घोणसरे सुतारवाडी येथे अपघात झाला. चालकाला डुलकी लागल्यामुळे वाहनावरचे नियंत्रण सुटले आणि ते रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडावर जावून आदळले. या अपघातात चालकासह १७ जण जखमी झाले आहेत.
याबाबत ग्रामस्थांकडून मिळालेली माहिती अशी, ठाणे, डोंबिवली आणि कल्याण येथील पोंक्षे परिवारातील १७ जण पर्यटनासाठी ६ डिसेंबरला सकाळी डोंबिवलीतून निघाले. त्यांनी १७ आसनी प्रवासी वाहन भाड्याने घेतले होते. ६ डिसेंबरला गुहागरला व्याडेश्वर दर्शन, समुद्राचा आनंद लुटून ही मंडळी संगमेश्वर तालुक्यातील पोंक्षे आंबव येथे जाणार होती. सायंकाळी ही गाडी पूल ओलांडून घोणसरे सुतारवाडी बसथांब्यापर्यंत आली. तिथे छोटासा चढ़ आणि छोटे वाकाण आहे, याच चढावावर चालकाला डुलकी आली आणि त्याचा गाडीवरील ताबा सुटला. अनियंत्रित झालेले वाहन रस्त्याच्या डाव्या बाजूला खाली उतरले आणि एका झाडावर जावून आदळले, या धडकेनंतर गाडी जागीच उलटली. चालक आणि प्रवासी फुटलेल्या काचेतून बाहेर पडले. झाडाला बसलेली धडक आणि नंतर गाडी उलटल्यामुळे गाडीतील प्रवासी एकमेकांवर आदळले. ही घटना समजल्यानंतर घोणसरे सुतारवाडीतील ग्रामस्थ आणि रस्त्यावरील प्रवाशांची अपघातग्रस्त चारचाकीमधील प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी धाव घेतली. गाडीतील मागील दरवाजा उघडून १५ प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. तातडीने खासगी वाहनांनी सर्वांना चिपळुणातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार १७ प्रवासी व चालक यांच्यापैकी एक महिला व एक पुरुष यांची प्रकृती अधिक गंभीर आहे. अन्य १५ प्रवाशांवर चिपळूण येथेच उपचार सुरू आहेत.
दरम्यानच्या काळात शिवसेना वैद्यकीय कक्षाचे कोकण विभागीय सचिव शशिकांत वाझे यांनी खासगी रुग्णालयात जावून सर्व जखमींची भेट घेतली. अपघाताबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माहिती दिली. त्यानंतर शिंदे यांनी शासकीय यंत्रणा आणि रुग्णालय व्यवस्थापनाकडून रुग्णांची माहिती घेतली व उपचारात कोणतीही कसुर करू नये, अशा सूचना दिल्या आहेत. या अपघाताची नोंद चिपळूण पोलिस ठाण्यात करण्याचे काम सुरू आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:40 AM 07/Dec/2024